देवळा प्रतिनिधी : देवळा तालुक्यात अवैध धंदे सुरू असून यामुळे तरूणाईमध्ये या धंद्यांची आवड व गुन्हेगारी वाढण्याची चिन्हे आहेत, यामुळे समाज हा वाम मार्गाला जाऊन भरकटत आहे अशी चिंता आरपीआय जिल्हाध्यक्ष दिनेश अहिरे यांनी व्यक्त केली आहे. कमी गुंतवणूक करून जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्यांकडे अनेक तरुणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत देवळा तालुक्यात अवैध धंद्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अशा धंद्यांकडे तरुणांमध्ये वाढलेला कल आणि पोलीस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणू तालुक्यात मोकळे रानच मिळाले आहे असा सनसनाटी आरोप आहिरे यांनी केला आहे.
तालुक्यातील विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे तालुक्याची प्रतिमा मलिन होत असून तालुक्यातील अवैध धंद्याना पोलिसांनी एनओसी दिली काय? असा प्रश्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे नाशिक जिल्हाध्यक्ष दिनेश आहिरे यांनी उपस्थित केला आहे.
या अवैध धंद्यांनी कित्येक कुटुंब देशोधडीला लागले आहेत. तरीही या धंद्यांच्या नादी लागणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. या व्यवसायाबद्दल आरडाओरड झाल्यास काही दिवसांसाठी हे व्यवसाय छुप्या पध्दतीने चालविण्यात येतात. त्यानंतर मात्र परिस्थिती जैसे थे होते. देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम सट्टापट्टी, इतर अवैध मटका, जुगार, हातभट्टी व्यवसाय सुरु आहे. मात्र असे असतानाही या पोलीस ठाण्याकडून त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटिल यांनीच यात लक्ष घालावे, असे आहिरे यांनी म्हटले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम