द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; मातापित्यांना वृद्धाश्रमात टाकणाऱ्या व बांधावरून खून-मारामाऱ्या होणाऱ्या जगात मातृ-पितृच्या पूजनाप्रित्यर्थ कुणी भूमीदान करत असेल तर समाजातील प्रत्येक घटकाने दातृत्वाचे हे अनोखे दर्शन घेत आपण कुठे आहोत याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
मकरंदवाडी ता.देवळा येथील जिभाऊ खैर हे उद्या शुक्रवार (दि.२४) रोजी मातृ-पितृ पूजन करत आईची ग्रंथतुला करणार आहेत. एवढेच नव्हे तर आपल्या स्वतःच्या मालकीची अडीच एकर जमीन श्रीराम शक्तीपीठ श्रीक्षेत्र चाकोरे (बेझे) ता.त्र्यंबकेश्वर देवस्थानला दान केली जाणार आहे. या कार्यक्रमानिमित्त सायंकाळी चार वाजता देवळा येथे आशादीप मंगल कार्यालयात समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन होणार आहे.
एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू नये या धारणेचे जिभाऊ खैर हे नाशिक येथे शिक्षणसंस्थेत कार्यरत आहेत. कोरोनाकाळात त्यांनी कोरोनारुग्णांची सेवा करताना त्यांनी जे दुःख, कृत्रिम नाती, जगण्याची धडपड पाहिली, त्यातून पैसा हा सर्वस्व नाही असा बोध घेत जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच बदलून गेला. समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून त्यांनी जमीन दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
देवळा-नाशिक रस्त्यालगत असलेल्या या जमिनीवर अथवा तिच्या मोबदल्यात ज्ञानमंदीर, वृद्धाश्रम, आधाराश्रम, अनाथालय, गोशाळा यांसह अध्यात्मिक केंद्र व्हावे अर्थात अशा कार्यासाठी वापर व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यांच्या या निर्णयाला पत्नी रत्नमाला व दोन मुली ज्ञानेश्वरी व इंद्रायणी यांचा पाठिंबा आहे.
या कार्यक्रमास पंचायती आखाडा श्री निरंजनीचे स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज उपस्थित राहणार आहेत. निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष संजय धोंडगे, रामयणाचार्य भास्कर महाराज रसाळ यांचे सहकार्य असून रविंद्र ननावरे, राहुल साळुंखे, बाकेराव मामा यांचे संयोजन लाभत आहे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
असे करायला हिम्मत लागते राम कृष्ण हरि