नाशिक प्रतिनिधी : गोदावरी एक्स्प्रेस ही नाशिकची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते मात्र ह्या एक्स्प्रेसवर आता हिंगोळीकरांच्या नजरा फिरल्या आहेत. हिंगोलीच्या नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मनमाड-मुंबई गोदावरी एक्सप्रेस ही हिंगोलीपर्यंत नेण्याची मागणी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना तसे पत्र लिहिले आहे. हेमंत पाटील हे देखील शिवसेनेचे खासदार असून नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे काय भूमिका घेता हे बघणं महत्त्वाचे आहे. दोघीही आक्रमक झाल्यास सेनेच्या दोन खासदारात सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाटील यांनी केलेल्या मागणीला नाशिककरांनी मात्र कडाडून विरोध केला आहे. गोदावरी एक्सप्रेस (गाडी नं. 12117 आणि 12118) करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षापासून बंद आहे. ती सुरु करण्याची जोरदार मागणी होत असूनही रेल्वे दुर्लक्ष करत आहे त्यात लोकप्रतिनिधीनी लक्ष घालणे गरजेचे असतांना हवा तसा पाठ पुरावा दिसत नाही.
मनमाडहून सुटणारी गोदावरी एक्सप्रेस मुंबईला जाण्यासाठी नाशिक जिल्हा व शहरातील नागरिकांसाठी जीवनदायीनी आहे. या गाडीची वेळ तीच ठेऊन ती हिंगोलीपर्यंत न्यावी अशी हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांची मागणी आहे. गाडीच्या मार्गात हिंगोली, पूर्णा, परभणी, जालना, मुकुंदवाडी, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक, देवळाली, इगतपुरी, कल्याण, ठाणे, दादर, मुंबई ही प्रमुख स्थानके घ्यावीत, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडे पत्रात केली आहे. या पत्रावर दानवे काय भूमिका घेता हे बघन महत्त्वाचे आहे.
मात्र हिंगोलीपर्यंत नेण्यास नाशिककरांनी विरोध केला आहे. गाडी जिल्ह्याबाहेर नेऊ नये अशी मागणी मासिक पासधारक व प्रवासी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश फोकणे, माजी आमदार योगेश घोलप, किरण बोरसे, संजय शिंदे, कैलास बर्वे, उज्वला कोल्हे, दत्ताराम गोसावी, नितीन जगताप, रेल परिषदेचे गुरुमितसिंग रावल, रेल्वे प्रवासी संघटनेचे बाळासाहेब केदारे आदींनी केली आहे. गोदावरी एक्सप्रेस ही पंचवटीप्रमाणेच नाशिककरांची सोयीची व आवडीची गाडी आहे. मुंबईला जाताना सकाळी साडेनऊला ती नाशिकरोडला येते. ती हिंगोलीपर्यंत नेल्यास मराठवाड्याच्या नागरिकांची सोय होणार असली तरी नाशिककरांची गैरसोय होणार आहे. हिंगोलीपर्यंत गाडी नेल्यास ती तिकडूनच पूर्ण भरून येईल. मनमाड, निफाड, नाशिकरोड, देवळाली, इगतपुरी या स्थानकातील नाशिककरांना जागा मिळणार नाही, असा आक्षेप घेण्यात आला आहे.
नाशिक-पुणे एक्सप्रेस ही नाशिकपर्यंत होती ती भुसावळपर्यंत नेण्यात आल्याने नाशिककरांना जागा मिळत नाही. तपोवन एक्सप्रेस मनमाडपर्यंत होती. ती पळवून नांदेडपर्यंत नेण्यात आली. राज्यराणी एक्सप्रेसही मनमाड-मुंबई अशी होती. ती जालन्यापर्यंत नेण्यात आली. नाशिक च्या रेल्वे गाड्या पळवण्याचे षड्यंत्र थांबणार का लोकप्रतिनिधी जागे होणार का असा सवाल नागरिक करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम