द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कधीही पडू शकते. सरकार पडले तर आम्ही मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाऊ. जनतेच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. भाजप (BJP) एकहाती निवडणुका जिंकणारच, असा विश्वास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मोठा दावा केला आहे. केंद्रातील गेल्या तीन-चार दिवसांतील घडामोडी आणि राज्यातील विरोधी पक्षांतील नेत्यांचे सरकार पडण्याच्या वक्तव्यांनंतर आमदार लाड यांनी मोठा दावा केला आहे.
भाजप जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाविकास आघाडीचे सरकार हे वसुली, भ्रष्टाचारी आणि महिलांवर अत्याचार सहन करणारे सरकार आहे. भ्रष्टाचाराच्या, गैरवर्तनाच्या आरोप असलेल्या मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या आणि शेतकरी, एसटी कर्मचारी, एमपीएससीचे विद्यार्थी अशा अनेक समाजघटकांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या गेंड्याच्या कातडीच्या महाविकास आघाडी सरकारचा पापाचा घडा भरला आहे. अशा कुचकामी, बिनकामाच्या सरकारचा जनता जनार्दनच योग्य वेळी निकाल लावेल, अशा शब्दांत प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
प्रसाद लाड म्हणाले की, भ्रष्ट मंत्र्यांचं ओझं वाहणारं अत्यंत अकार्यक्षम, बेपर्वा सरकार असे या आघाडी सरकारचं वर्णन करायला हवं. गृहमंत्रिपद भूषवणाऱ्या मंत्र्याला पोलिस अधिकाऱ्यानेच १०० कोटी वसुलीचा आरोप झाल्यानंतर राजीनामा देणे भाग पडले. दुसऱ्या मंत्र्याला तरुणीच्या आत्म्यहत्येला जबाबदार असल्याचा आरोप झाल्याने मंत्रीपद सोडावे लागले.
यावेळी त्यांंनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा उल्लेख करत मुख्यंमंत्र्यावर निशाणा साधला. सरकार आदित्य ठाकरेंचे बालहट्ट पुरवत आहेत. आरे कारशेडला हरित लवाद, सर्वोच्च न्यायालयाची मान्यता असतानाही आदित्य ठाकरेंच्या बालहट्टापायी विरोध करण्यात आला. २७ हजार झाडांची कत्तल थांबवल्याचे सांगणाऱ्या ठाकरे सरकारने बिल्डर धार्जिणे धोरण आखत ३६ हजार झाडे तोडली. महाविकास आघाडी सरकार हे बालहट्ट पुरवणारे हे सरकार असल्याची टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली.
एसटी संपाला (ST Strike) भाजपचा पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. समितीचा अहवाल येईपर्यंत आम्ही थांबायला तयार होतो. परंतु परिवहन मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) सांगण्यावरून वेतनवाढ जाहीर केली. यामुळे कर्मचारी संतापले आहेत. विलिनीकरणाच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असे आमदार लाड यांनी स्पष्टपणे सांगितले.
जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे चार महिन्यांपूर्वीच सिद्ध झाले आहे. त्यामुळे ते पाडण्याबाबत जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे आमदार लाड यांनी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम