द पॉईंट नाऊ ब्युरो : देवळा नगरपंचायत निवडणुक रणधुमाळीत उदयकुमार आक्रमक होत भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्यावर सडकून टीका केली. केदा आहेर यांनी पाच वर्षे शहराचा सत्यानाश केला अशी जळजळीत टीका उदयकुमार आहेर यांनी प्रचार सभेत केली. प्रथम राष्ट्र मग पक्ष शेवटी स्वतः हे भाजपाच आहे. मात्र केदा नानांचे प्रथम मी, दुसरा भाऊ, अन तिसरा चुलत भाऊ आहे असे म्हणत एकामागोमाग शाब्दिक हल्ले चढवले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक कुणा एकाची जहागिरी नाही. देवळा तालुक्यातील जनतेचे लाखो रुपये जमा केले आहेत. देवळा शहरात यांची दहशत आहे. स्मारका समोरील रस्त्यावर दोन महिन्यांत खड्डे पडले, आम्ही काय काम केले विचारता त्यांना सांगतो देवळा शहरात पहिला काँक्रेट रस्ता मी केला, शहरातील गॅस कनेक्शन मी आणलं आहे. लोक कसे जगतील याकडे लक्ष द्या तुम्ही त्यांच्या दशक्रिया विधीची व्यवस्था नका करू, मी शहराला साडे चार कोटींची पाणीपुरवठा योजना आणली.
मी जे बोलतो ते खोट असेल तर केदा आहेरांनी समोर यावं जनतेसमोर चर्चेला बसावे मी तयार आहे. रामेश्वर धरणाची पाणी पुरवठा योजना चुकीचीच आहे. जाती जातीत तेढ निर्माण करण्यात आला. गोरगरिबांना त्रास आम्ही देत नाही, टपऱ्या बांधण्यासाठी लाख रुपये घेतले गरिबांना कर्जबाजारी केले. असे अनेक आरोपांच्या फैरी झाडत केदा आहेर यांना लक्ष केले.
अतुल पवार म्हणजे केदा आहेरांचा पोपट आहे अशा शब्दांत अतुल पवारांना टोला लगावला, 1 रुपया न देता निवडणूक लढा म्हणजे प्रत्येकाला स्वतःची लायकी समजेल अशा शब्दांत विरोधकांना आवाहन केले. शहरातील टपरी धारकांना त्यावेळेस वाचवलं, घरापर्यंत गॅस पोहचवला हे उदय आहेरांची कामे आहेत, तुमच्या सारखे भ्रष्टाचार केले नाहीत टक्केवारी घेतली नाही असा थेट हल्ला चढवला.
माझा अर्धा कुंकू पुसत असते….
अश्विनी आहेर बोलतांना म्हणाल्या माझा नवरा जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हाच मी माझा अर्धा कुंकू पुसत असते…. कारण नवरा घरी परत येईल की नाही हे सांगता येत नाही, देवळा शहरात दहशत आहे. राखीव जागा झाली म्हणून नेत्यांचा इतका त्रागा का ? नगरपंचायतचा कारभार हा पतीने नव्हे तर स्वतः महिलेने चालवला पाहिजे. महिलांचे हक्क हिरावू नका, तुमचा आवाज उठवण्यासाठी मी सक्षम आहे. तुमचा आवाज मी बनणार आहे. या शहरात महिलांना स्वछता गृह नाही, काय विकास केला यांनी. महिलांना स्वछता गृह बांधू शकले नाही, यापेक्षा दुर्दैवी काय असणार, अग्निशामक दलाची गाडी नाही. काही अनुचित प्रकार घडल्यास याची जबाबदारी कोण घेणार. घरातील करता मुलगा बिघडवला जातोय. महिलांनी पुढाकार घ्या यांच्या भूलथापांना उलथवून लावा. सक्षम विरोधक पाहिजे असेल तर मला तुमचा पाठिंबा द्या.
सुरवातीला आबा खैरनार यांनी शहरातील जातीय तेढ तसेच ओबीसी आरक्षण याबद्दल आपली नाराजी व्यक्त करत सक्षम नेतृत्वाला निवडुन द्या असे आवाहन त्यांनी केले. सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम