नाशिक प्रतिनिधी : नाशिक शहरात पोलिसांनी कारवाई सुरू असून आता थेट गच्ची गाठल्याने अनेकांची तारांबळ उडाली आहे. पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आलेली आहे. (nylon manja ban in nashik) तरीदेखील चोरी छुप्या मार्गाने पतंग अधिक वरती जावी यासाठी अनेकजन नायलॉन मांजा कुठूनतरी मिळवून पतंग उडवतात. तर, अवैधरित्या अव्वाच्या सव्वा दर आकारून हा मांजा विक्रेते विकत आहेत. त्यामुळे नाशिक पोलिसांनी थेट गच्चीवर जाऊन नायलॉन मांजा बाळगणाऱ्यावर कारवाई सुरु केली आहे. यामुळे छुप्या रुस्तमांची चांगलीच धांदल उडाली आहे.
सकाळपासून शांत असलेला संक्रांतिचा उत्सव दुपारनंतर सेलिब्रेशन मोडवर सुरू झाला. दोन वाजेच्या दरम्यान नाशिक शहरातील अनेक इमारतींच्या धाब्यांवर डीजेचा दणदणाट सुरू झाला अन पोलिसांनी देखील शांतीत क्रांती करत चांगलीच तारांबळ उडवली…
नवीन नाशकातत थेट गच्चीवर जाऊन पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. मकरसंक्रांतिच्या निमित्ताने अनेकजन गच्चीवर जाऊन पतंग उडविण्याचा आनंद घेत आहेत. दरवर्षीपेक्षा यंदा प्रतिसाद कमी असला तरीदेखील संक्रांतिचा पतंगोत्सव आनंदात साजरा करण्यासाठी अनेकांनी कालच पतंग आणून ठेवले होते.
मात्र सकाळी थंडी जास्त असल्याने दुपारी 2 वाजेनंतर पतंगाचा आनंद लुटण्यासाठी अनेकांनी गच्ची गाठली. मात्र पोलिसांच्या पथकांची तपासणी अनेकठिकाणी सुरु असल्यामुळे यंदा पतंग उडविण्याचा उत्साह काहीसा कमी प्रमाणात दिसून येत आहे.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायलॉन मांजा बाळगणाऱ्या पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. अनेक दुचाकीस्वारांच्या गळ्यात मांजा अडकल्यामुळे गळे चिरले गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच पक्ष्यांच्या जीवाला, वन्यप्राण्यांना इजा होऊ नये तसेच यासठी या मांजावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने सण साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
डीजे लाऊन मोठ मोठ्या आवाजात धांगडधिंगा करणाऱ्यांवर देखील मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे नाशिक पोलिसांनी सांगितले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम