द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : लिंबाच्या किंमती आवक्याबाहेर गेल्याने सामान्य माणसाला त्याचा फटका बसत आहे. पण, पंजाबमधील एका तुरुंग अधिकाऱ्याने चक्क लिंबू खरेदीमध्ये घोटाळा केला आहे. लिंबू खरेदीचे बनावट बिल बनवून पैसे लुटले असून पंजाबमधील आप सरकारने अधिकाऱ्याला निलंबित केले आहे.
कपूरथळा मॉडर्न कारागृहाचे अधीक्षक गुरनाम लाल यांना निलंबित करण्यात आले आहे. पंजाबचे तुरुंग, खाण आणि पर्यटन मंत्री हरजोतसिंग बैंस यांना तुरुंगातील कैद्यांकडून तक्रार आली की तुरुंग अधीक्षक बनावट रेशन बिले वाढवत आहेत आणि बिलांमध्ये दर्शविलेल्या वस्तू तुरुंगातील कैद्यांना कधीही दिल्या जात नाहीत. त्यानंतर सरकारने तपासणी केली असता सत्य समोर आले. लाल यांनी गेल्या १५ ते ३० एप्रिलच्या कालावधीत सुमारे ५० किलो लिंबू २०० रुपये प्रति किलो दराने खरेदी केल्याचे प्रशासनाला आढळून आले. त्यानंतर पंजाब सरकारने गुरनाम लाल यांना निलंबित केले आहे.
मंत्र्यांनी साठा व बिले पडताळण्याचे आदेश दिले. त्यानुसार वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीत लिंबाची बिले बनावट असल्याचे समोर आले. तुरुंगातील कैद्यांनीही अधिकाऱ्यांना सांगितले होते की, त्यांना कधीही लिंबू दिले गेले नाहीत. रेशन आणि भाजीपाला साठ्याच्या चौकशीमध्येही अनियमितता उघडकीस आली. या चौकशीत भाजीपाला आणि गव्हाचे पीठ खरेदी घोटाळ्याचेही संकेत मिळाले आहेत. कैद्यांना दिले जाणारे अन्न निकृष्ट दर्जाचे होते आणि ते तुरुंगाच्या नियमावलीत नमूद केलेल्या प्रमाणाशी जुळत नाही, असं लेखा अधिकाऱ्यानं आपल्या अहवालात म्हटलं आहे.
कारागृह अधीक्षकांनी गलथान कारभार केला आणि हलगर्जीपणा करणाऱ्या कनिष्ठांवर त्यांचे नियंत्रण नसल्याचाही आरोप आहे. त्यानंतर पंजाबमधील आप सरकारने कारागृह अधीक्षक गुरनाम लाल यांना निलंबित करण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम