द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : गेल्या सात दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. या संपामुळे राज्यभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. आता भाजपनेही या संपात उडी घेतली आहे. राज्यात एसटी संपावरुन विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष आमनेसामने आले आहेत. राज्यशासनानेही या संपाच्या विरोधात कठोर भुमिका घेत कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. राज्यशासनानेही कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू होण्याचे आवाहन केले होते. मात्र कर्मचारीही माघार घेण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. या सर्व घडामोडींमध्ये एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष आणि खासदार अरविंद सावंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संबोधून पत्र लिहीले आहे.
प्रिय एसटीतील सुज्ञ कर्मचारी, कामगार बांधवानो, भगिनींनो
दिवाळी पासून आपण सर्वजण हळूहळू संपात सामील झालात आणि आपल्याच प्रवाशांना ऐन दिवाळीत आपण जे “प्रवाशांच्या सेवेसाठी ” ब्रीद मिरवतो त्या सेवेपासून निव्वळ वंचित नव्हे तर वेठीस धरण्याचे काम केले.
बांधवानो, भगिनींनो होय हे कबूल आहे की एसटीतील कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. पण, हे माहीत असतानाही आपण नोकरी स्वीकारली. त्यातही आताच कुठे कोरोनाच्या बंधनातून आपण थोडेसे मोकळे होऊन आपली सेवा सुरु झाली. थोडासा महसूल येऊ लागला आणि आपण हा संप केला. अंतर्मुख व्हा, शेजारील कर्नाटकमध्ये भाजपाचे सरकार आहे. तेथेही एसटी कर्मचाऱ्यांनी याच मागणीसाठी १५ दिवस संप केला. त्याचे काय झाले याची माहिती घ्या ही विनंती.
तिच भाजपाची मंडळी इथे आपली माथी भडकवतायेत आणि आपण त्यांच्या राजकारणाला बळी पडतोय. कोरोनाच्या संकटात आमच्या काही एसटी कर्मचाऱ्यांनी जीवावर उदार होऊन काम केले त्यांचा आम्हाला अभिमानच आहे. परंतू त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक कर्मचाऱ्यांना घरी बसून पगार दिला गेला याचीही आपल्याला जाण असायला हवी. एव्हढेच नव्हे तर माननीय परिवहन मंत्री नामदार अनिल परब यांनी तीन हजार कोटी रुपयांहून अधिक अर्थसहाय्य आदरणीय मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने मिळवले म्हणून पुढील पगार मिळाले.
असे मवाळ पत्र शासनाने कर्मचाऱ्यांसाठी लिहिले असले तरी शासन किती दिवस या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करणार आहेत. शासनाने या मागण्यांवर तोडगा काढणे गरजेचे आहे. असेच सुरु राहिले तर आपलेच बांधव यांचे जीवन धोक्यात येईल याची जाणीव सरकारला व्हावी हीच अपेक्षा आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम