देवळा प्रतिनिधी : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या उमराणे येथील बहुचर्चित स्व.निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध पार पडली. येथील प्रत्येक निवडणूक ही पारंपारिक विरोधक आणि चुरशीची होत असल्याचा इतिहास असला तरी मंगळवारी (दि.४) माघारीच्या अखेरच्या दिवशी वाटाघाटी यशस्वी ठरल्याने व शिल्लक सहा उमेदवारांनी माघार घेतल्याने ही बाजार समितीची निवडणूक इतिहासात पहिल्यांदा बिनविरोध झाली. याकामी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे व आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या यशस्वी मध्यस्थी कामी आली .
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या राजकारणात बहुचर्चेत असलेल्या या बाजार समितीच्या १८ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया चालू होती. यात येथील पारंपारिक प्रतिस्पर्धी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे व बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे यांच्यासह तिसरा गट या निवडणूक प्रक्रियेत सक्रीय होता. या निवडणुकीमुळे समितीचे कार्यक्षेत्र असलेल्या गावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यात पहिल्याच टप्प्यात १८ जागांसाठी ३५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र यातील सात अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने ग्रामपंचायत गटातील चार व सोसायटी गटातील एक अशा पाच जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित १३ जागांसाठी २३ अर्ज वैध होते. आणि बिनविरोध होण्यासाठी दहा उमेदवारांची माघार होणे गरजेचे होते. गेल्या पाच -सात दिवसांपासून यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असले तरी उभय गटात व उमेदवारांत समझोता होत नसल्याने यश येत नव्हते. मात्र शुक्रवार (दि.३१) रोजी एक, सोमवार (दि.३) रोजी तीन आणि आज मंगळवार (दि.४) रोजी अखेरच्या क्षणी सहा उमेदवारांनी माघार घेतल्याने शिल्लक तेरा उमेदवारांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला.
बिनविरोध निवडणूक आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे ; सोसायटी गटातून दादाजी भीमा खैरनार, यशवंत ठाकरे,प्रा सतीशकुमार ठाकरे, प्रशांत देवरे, राजेंद्र पुंडलिक देवरे, दीपक आनंदा निकम, मिलिंद केशवराव शेवाळे, बेबीबाई खैरणार, सुमनबाई पवार, देवानंद वाघ, अनिता बस्ते यांची निवड झाली .
ग्रामपंचायत गटातून वैशाली आहिरे, विलास देवरे, अंजली केदारे, प्रवीण आहिरे यांचा समावेश आहे. *व्यापारी गटात प्रवीण देवरे व सुनील देवरे *हमाल व तोलारी या मतदारसंघातून साहेबराव देवरे यांची निवड झाली.
“बाजारसमितीच्या सर्वांगीण विकासासाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे वरिष्ठ नेत्यांचे मत आणि त्यांचे मार्गदर्शन यातून परस्पर सामंजस्याने ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशही आले. शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” -विलास देवरे, माजी सभापती उमराणे बाजार समिती
“गावाच्या व बाजारसमितीच्या अर्थात शेतकऱ्यांचा विकास समोर ठेवून आणि कोणतेही वैमनस्य वाढू नये ही भूमिका धरून सदर निवडणूक बिनविरोध झाली. यासाठी वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न कामी आले.” – प्रशांत देवरे, माजी जि.प.सदस्य
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम