द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (इगतपुरी) : इगतपुरी तालुक्यातील होऊ घातलेल्या उर्ध्व कडवा लघुपाटबंधाऱ्याच्या भूसंपादनास शेतकरी वर्गाने विरोध दर्शवला आहे. आधीच तालुक्यात असलेली 16 धरणे काही समाधान देऊ शकली नाहीत, मग हे 17 वे धरण कशाला, असा सवाल करत शेतकरी वर्गाने यास विरोध केला आहे. याआधी वारंवार विरोध दर्शवून देखील काही एक पाऊल न उचलले गेल्याने पुन्हा एकदा याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
इगतपुरी तालुका हा धरणांच्या असलेल्या संख्येमुळे पाण्याच्या दृष्टीने समृद्ध समजला जातो. या नियोजित धरणामुळे आदिवासी समाजाची अंदाजे 450 ते 500 कुटुंब भूमिहीन आणि बेघर होण्याचा अंदाज आहे. यामुळे शेतकरी यास कडाडून विरोध करत आहेत. या प्रस्तावित धरणाच्या विरोधात संतप्त शेतकरी वर्गाने आमदार माणिकराव कोकाटे यांच्या बैठकीवर देखील बहिष्कार घातला होता.
आता याबाबत पुन्हा एकदा विरोध दर्शवणारे निवेदन इगतपुरीच्या सहाय्यक अभियंत्यांना देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना खोट्या भूलथापा देऊन राजकीय फायद्यासाठी त्यांना फसवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी याआधी वारंवार विरोध दर्शवून, शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळावा किंवा जमिनी द्याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. तर शेतकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा देखील इशारा दिला होता. शासकीय अधिकाऱ्यांद्वारे मोबदला दिला जाईल म्हणून आश्वासने देखील दिली गेली. मात्र आजवर त्यावर काही एक पाऊल न उचलले जाऊन शेतकऱ्यांना केवळ आश्वासनांची गाजरच दाखवली जात आहेत. असा आरोप करण्यात आला आहे. यामुळे यासंदर्भात आता पुन्हा बाळू लक्ष्मण गायकवाड यांच्याद्वारे निवेदन देण्यात आले आहे. या प्रश्नाबाबत नेमका अंतिम निकाल लागणार तरी कधी याची बाधित शेतकरी वाट पाहत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम