
देवळा : ( सोमनाथ जगताप)
देवळा ग्रामीण रुग्णालयात गुरुवार (दि.२१) रोजी घेण्यात आलेल्या आयुष्यमान आरोग्य मेळाव्यात तब्बल एक हजार २५४ रुग्णांची विक्रमी तपासणी करण्यात आली . तसेच डिजिटल हेल्थ आय.डी. व आयुष्यमान भारत कार्डचेही वितरण करण्यात आले. या आरोग्य मेळाव्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला.

या मेळाव्याचे उदघाटन नगराध्यक्षा भारती आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रुग्णकल्याण समितीचे सदस्य तथा गटनेते संजय उर्फ संभाजी आहेर, नगरसेवक अशोक आहेर, भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, तहसीलदार विजय सूर्यवंशी, गटविकास अधिकारी राजेश देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने ग्रामीण रुग्णालयात आयुष्यमान आरोग्य मेळावा झाला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणेश कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
या प्रसंगी उपस्थितांना युनिक हेल्थ आयडी कार्ड देण्यात आले. तसेच विशेष तज्ञांमार्फत सर्व रोग निदान तपासणी करण्यात आली.यात हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, यकृत व फुफ्फुसांचे आजार, गरोदर माता व स्त्री रोग, बालरोग तपासणी, मोतीबिंदू तपासणी, कान -नाक -घसा तपासणी, अस्थिरोग, क्षयरोग व दुर्धर आजार, मोफत रक्त, लघवी, क्ष-किरण इ.सी.जी., गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया, किशोरवयीन मुला-मुलींसाठी मार्गदर्शन, मरणोत्तर नेत्रदान संदर्भात संमतीपत्र भरून देण्याची सुविधा, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत संदर्भित बालकांचे गरजेनुसार उपचार व मार्गदर्शन या प्रकारच्या सुविधा मोफत देण्यात आल्या. ब्रम्हकुमारी अंजुदीदी यांनीही व्यसनमुक्ती व मेडिटेशनबाबत मार्गदर्शन केले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश आहिरे, डॉ.निलेश पवार, डॉ.सुलेमान फैजल, डॉ.राठी, डॉ.देसले, डॉ.प्रदीप बच्छाव, डॉ.भूषण कर्णावट यांनी रुग्णतपासणी केली. मेळावा यशस्वीतेसाठी तालुक्यातील आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच परिचारिका, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशावर्कर यांनी परिश्रम घेतले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम