द पॉईंट प्रतिनिधी : संपूर्ण जगाची सर्वात मोठी डोकेदुखी जर कुठली असेल, तर ती आहे दहशतवाद. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेंड सेंटर वरील ९/११ चा हल्ला, भारतात मुंबईतील २६/११ चा हल्ला असे अनेक हल्ले दहशतवादी संघटनांद्वारे जगभरात करण्यात आलेत.
आता अफगाणिस्तानमधील तालिबान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तान वर कब्जा मिळवला आहे. सध्या संपूर्ण अफगाणिस्तान मधील लोक देश सोडून पलायन करत आहेत.
या तालिबान संघटनेची स्थापना झाली ती १९९४ मध्ये. अफगाणिस्तान मधील कंधार मध्ये तालिबान ची स्थापना झाली. १९९६ मध्ये तालिबानने अफगाणिस्तान वर राज्य केले होते. अमेरिकेत वर्ल्ड ट्रेंड सेंटर वर झालेल्या हल्ल्यात अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या ओसामा बिन लादेन चा हात असल्याची खात्री अमेरिकेला झाल्याने, लादेन ला सोपवण्याची मागणी अमेरिकेने केली होती. मात्र तालिबान ने यास नकार दिल्याने अमेरिकेने अफगाणिस्तान वर हल्ला करत, तालिबान ची सत्ता उलथवून लावत,तिथे लोकशाही सरकार स्थापन केले. त्यानंतर तिथे अमेरिकन सैन्याचा मुक्काम आजतागायत होता.
सध्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी अमेरिकन सैन्य अफगाणिस्तान मधून लवकरच माघारी घेतले जाईल याची घोषणा केल्यानंतर, आता अफगाणिस्तान मध्ये बिकट परिस्थिती निर्माण झालीय. तालिबान ने संपूर्ण अफगाणिस्तान वर कब्जा मिळवत पुन्हा सत्ता स्थापन केल्याने, इथले सर्व नागरिक सध्या दहशतीखाली जगत आहेत. इथल्या अधिकाधिक नागरिकांनी तालिबानच्या जुलमी सत्तेला घाबरत, देशातून पलायन करायला सुरुवात केली आहे.
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देखील पुढील रक्तपात टाळण्यासाठी देश सोडत असल्याचे म्हणत अफगाणिस्तान मधून काढता पाय घेतला. त्यामुळे तालिबान ने युद्ध समाप्तीची घोषणा केली. लोकांनी घाबरू नये, कोणालाही काही त्रास दिला जाणार नसल्याचे जरी तालिबान म्हणत असले, तरी नागरिक जिवाच्या धास्तीने देश सोडत आहेत. इतर देशातील अफगाणिस्तान मध्ये असलेल्या आपल्या नागरिकांना देखील त्या त्या देशांद्वारे पुन्हा परत आणले जात आहे. यामुळे संपूर्ण जगाने अफगाणिस्तानला एकटे सोडल्याची भावना नागरिक व्यक्त करताय.
तालिबानच्या शर्यत कायद्यामुळे महिलांना इथे कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य राहत नसल्याने, इथून मोठ्या प्रमाणावर महिला वर्गासह नागरिकांनी देश सोडलाय. यामुळे अफगाणिस्तान मधील पुढचे चित्र हे भयावह असल्याच्या भावना व्यक्त केल्या जाताय.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम