सोमनाथ जगताप
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; सोग्रस ते सटाणा या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे, याची दखल घेत भाजपा नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर व चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर यांनी रास्ता रोको चा इशारा दिला होता. मात्र लेखी आश्वासन मिळताच भाजपाने आंदोलनातून माघार घेतली होती. महिना उलटला तरी अधिकारी मात्र आश्वासन पूर्तीकडे वाटचाल करतांना दिसत नाही. यामुळे अधिकाऱ्यांनो ‘क्या हुआ तेरा वादा’ म्हणायची वेळ आली आहे.
आज देवळा – सटाणा राज्यमार्गावर माळवाडी फाट्यावर खड्डा चुकविण्याच्या नादात पाठीमागून येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने दुसऱ्या वाहनाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली .
आज मंगळवारी( दि ९) रोजी सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास देवळा -सटाणा राज्यमार्गावरील माळवाडी फाट्यावर खड्डा चुकविण्याच्या नादात देवळ्याच्या दिशेने जात असलेल्या ( एम एच 15 एफ एफ 3659 ) बलेनो या कारला पाठीमागून येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने मोठे नुकसान झाले आहे . दरम्यान, देवळा – सटाणा राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे . या खड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. वाहनधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, या मार्गावरील खड्डे तात्काळ दुरुस्त करावेत अशी मागणी करण्यात येत आहे .
सोग्रस ते सटाणा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी भारतीय जनता पक्षाने आंदोलनाचा इशारा देताच संबंधित विभागाने सदरचा खड्डेयुक्त रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन मिळाले होते. मात्र भाजपाच्या इशाऱ्याला केराची टोपली अधिकाऱ्यांनी दाखवली अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर भाजपा काय निर्णय घेणार हे बघणं महत्वाचे आहे.
या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात यावे या मागणीसाठी आमदार डॉ. राहुल आहेर व भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते. परंतू सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता आर के पाटील यांनी उभय नेत्यांशी चर्चा करून सदरचे काम दोन दिवसात सुरू करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने भारतीय जनता पक्षाने पुकारलेले रास्ता रोको आंदोलन स्थगित केले होते. परंतु महिना उलटूनही परिस्थिती जैसे थे आहे.
रस्त्याचा सोक्षमोक लावणार – आ.डॉ.आहेर
लेखी आश्वासन देऊन महिला उलटला तरी गेंड्याच्या कातडीचे प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत आहे. येत्या दोन दिवसात संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग नाही निघाला तर भाजपा आक्रमक होऊन जनतेला न्याय मिळवून देईल, या प्रकरणाचा सोक्षमोक लावणार, आमची बांधिलकी जनतेशी आहे, अधिकारी काम करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे.
संबंधितांशी बोलून मार्ग काढतो – प्रशांत सोनवणे (अधीक्षक अभियंता ,PWD)
गेल्या काही दिवसांपूर्वी लोकप्रतिनिधीनी आंदोलनाचे हत्यार उपसले असता, स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. मात्र कामात दिरंगाई झाली असेल तर त्याची चौकशी करून काम लवकर सुरू करू जनतेला त्रास होत आहे हे दुर्दैवी असून कामात दिरंगाई होणार नाही याची खबरदारी घेऊ. येत्या दोन तीन दिवसात काम सुरू होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम