औरंगाबाद येथील व्यासपीठावरील आजी-माजी आणि सोबत आले तर भावी सहकारी असा नेत्यांचा उल्लेख करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात धमाल उडवून दिली आहे.
खरेतर भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आमदार सांभाळण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या राज्यस्तरीय नेत्यांना ‘लवकरच सरकार बनेन, पंधरा दिवसातच सरकार बनेन, दोन दिवसातच सरकार बनेन, पाच दिवसात बघा काय होतय!!” अशा पद्धतीच्या आमदारांना संभ्रमात टाकणारे वक्तव्य करण्याची गरज पडत आहे.
प्रत्येक पक्ष आपापले आमदार सांभाळण्याची सर्कस गेल्या दोन वर्षापासून करीत आहे. मात्र, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या कालच्या “मला माजी मंत्री म्हणून नका, दोन-तीन दिवसात बघा काय होतं ते!!”
या वक्तव्याचा उलट-सुलट अर्थ पत्रकार व मिडिया लावत असतानाच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी एका बाणात चार पक्षी मारण्याचा विक्रम केला आहे. मला ‘धनुष्यबाण’ व्यवस्थित चालवता येतो याचा प्रत्यय आणून देण्याचं काम त्यांनी आजच्या औरंगाबाद येथील वक्तव्यात दाखवून दिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते सतत आमच्या पाठिंब्यावरच सरकार टिकून आहे असे म्हणत असतानाच सरकारला ब्लॅकमेल करण्याचे काम करताना गेली दोन वर्ष आपण सर्वजण अनुभवतो आहोत.
त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, अशा वल्गना काही भाजपा नेते करीत असतात. अशा परिस्थितीत सरकार सांभाळण्याचे कसब राज्याच्या मुख्यमंत्र्यांना करावे लागते.
मात्र, तुम्ही जर आघाडीच्या सरकारमधील पक्षांना सोडून भारतीय जनता पार्टीत जाण्याचा प्रयत्न करणार असाल तर आधीच सांगून ठेवतो की, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होऊ शकते. अशा पद्धतीचा संदेश शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील काही आमदारांना देण्याचा काम उद्धवजी ठाकरे यांनी केले आहे. त्याच बरोबरीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना देखील तुम्ही मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नका.
मी भारतीय जनता पार्टी सोबत देखील सरकार बनवू शकतो आणि तुम्हाला विरोधात बसायला भाग पाडू शकतो. असा संदेश देण्याचे काम देखील आजच्या वक्तव्याने उद्धवजी ठाकरे यांनी केलेले आहे.
त्याचबरोबरीने उद्धवजी ठाकरे यांनी टाइमिंग साधलेले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष यांनी सरकार बनविण्याच्या संदर्भात केलेल्या अर्धवट अर्थाचा पूर्णपणे फायदा उचलून त्यांनी चंद्रकांतदादा पाटील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे या सर्वांसह अनेकांना बुचकळ्यात टाकलेले आहे यावरून उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शक किंवा स्वतः उद्धव ठाकरे किती राजकीय तयारीचे आहेत आणि मुरलेले राजकारणी आहेत हे सिद्ध होते.
— उदयकुमार आहेर (09922209796)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम