द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वादात दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. दोन्ही नेते दररोज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात . संजय राऊतांनी आज सकाळीच एक ट्विट करून किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानचे थेट पश्चिम बंगालसोबत संबंध असल्याचा आरोप केला आहे.
ईडीने पश्चिम बंगालमधील मेट्रो डेअरीवर छापेमारी केली. त्यानंतर याच डेअरीकडून किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखो रुपये मिळाले. या सर्व प्रकरणाची क्रोनोलॉजी समजा, असं ट्विट संजय राऊतांनी केलं आहे. तसेच या सर्व घोटाळ्यांचा हिशोब हा द्यावा लागेल, असंही ते म्हणाले.
संजय राऊतांनी सोमवारी सकाळीच एक ट्विट करून किरीट सोमय्यांवर आरोप केले होते. ज्या कंपन्यांवर ईडी छापेमारी करतेय त्याच कंपन्यांकडून सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला करोडो रुपये जातात, असा आरोप राऊतांनी केला होता. गेल्या २०१३ मध्ये किरीट सोमय्यांनी एका कंपनीवर आरोप केले होते. त्यानंतर २०१६ मध्ये या कंपनीवर ईडीने कारवाई केली. त्यानंतर २०१८-१९ या कालावधीत किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला याच कंपनीकडून करोडो रुपये मिळाले. राऊतांनी आज दुसऱ्या कंपनीचे नाव घेऊन त्यांच्याकडून सोमय्यांना पैसे आल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, सोमय्या कुटुंबीयांनी टॉयलेट घोटाळा केला असून हा १०० कोटींचा घोटाळा असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं. युवक प्रतिष्ठानद्वारे घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांनी केला होता. संजय राऊतांनी माफी मागावी आणि त्यांच्याविरोधात तक्रार करणार असल्याचा इशारा सोमय्यांनी दिला होता. अखेर सोमय्यांनी सहकुटुंब मुलूंड पोलिस ठाण्यात जात राऊतांविरोधात तक्रार नोंदवली आहे. तरीही राऊतांनी आज परत युवक प्रतिष्ठानबाबत आरोप केले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम