Zilla Parishad | राज्यात विधानसभा निवडणुकींचा धुरळा संपल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्ष आणि स्थानिक नेतेमंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची वाट पाहत आहेत. सर्वांनाच जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकींचे वेध लागले असले तरी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय सुनावल्यानंतरच या निवडणूकींचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे साधारण मार्च महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. मागील काळात राज्याच्या तसेच तालुक्याच्याही राजकारणात अनेक राजकीय घडामोडी झाल्याने या निवडणुकीत राजकीय पक्षांचे अस्तित्व आणि स्थानिक पुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याने आतापासूनच इच्छुक उमेदवारांनी जोमाने तयारी सुरू केली आहे.
देवळा तालुक्यात वाखारी, उमराणे आणि लोहोणेर हे तीन जिल्हा परिषद गट आहेत. यातील उमराणे वगळता इतर दोन्ही गटात बाहेरीलच सदस्य आहेत. वाखारी गटात २३ गावं असून जवळपास ३० हजार एकूण मतदान आहे. गेल्या निवडणुकीत हा गट महिला आरक्षित असल्याने राष्ट्रवादीच्या डॉ. नूतन सुनील आहेर, भाजपच्या भारती अशोक आहेर आणि अपक्ष अश्विनी उदय आहेर या येथील उमेदवार होत्या. यात डॉ. नूतन आहेर यांना १२ हजार मतं मिळाली होती. तब्बल ५ हजारांच्या मताधिक्याने त्या विजयी झाल्या होत्या. दरम्यान, या निवडणुकीत त्यांचे पती सुनील आहेर हेदेखील इच्छुक आहेत.
Deola | श्रावण बाळ संस्थेची बांधिलकी; दिव्यांग बांधवांसोबत साजरी केली दिवाळी
Zilla Parishad | यंदा आयात उमेदवार नको..!
दरम्यान, वाखारी गटात यंदा आयात किंवा प्रस्थापित उमेदवार नको तर ज्याला गटातील प्रश्न माहीत असतील असा आपल्या गावांमधील आणि आपल्यातील उमेदवार असावा, अशी मतदारांची भावना असल्याने गेल्या निवडणुकीत धनशक्ती आणि प्रस्थापितांसमोर मागे हटलेले ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारही आता पुढे सरसावले आहेत. त्यामुळे आता अनेक नवे चेहरे समोर आले आहेत. तर, या ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांची लवकरच सहविचार सभा पार पडणार असून, या सभेत काय निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. तरी शहरी पुढाऱ्यांची मक्तेदारी जिल्हा परिषदेतून मोडीत काढण्यासाठी इच्छुकांकडून ग्रामीण उमेदवार देण्यासाठी हालचाल होण्याची शक्यता आहे.
असे आहेत वाखारी गटातील इच्छुक उमेदवार
शिवाजी जाधव – वाखारी येथील शिवाजी जाधव हे शेतकरी आहेत. तसेच त्यांची पतसंस्था असून, ते एक व्यवसायिकही आहेत. सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांचा गटात चांगला जनसंपर्क आहे. वाखारी हे गाव गटातील महत्त्वाचे आणि मोठे गाव असल्याने उमेदवारी निर्णायक ठरू शकते.
भाऊसाहेब पगार – खुंटेवाडी येथील जाणीव पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच देवळा बाजार समितीचे विद्यमान संचालक असलेले भाऊसाहेब पगार हे राजकारण तसेच समाजकारणात सक्रिय असून, त्यांचा चांगला जनसंपर्क आहे.
सुनील आहेर – राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक तालुकाध्यक्ष, सुनील आहेर खाजगी कृषि मार्केटचे संचालक, वाखारी गटाच्या विद्यमान जि.प सदस्या डॉ. नूतन आहेर यांचे पती सुनील आहेर हे देखील इच्छुक असून, त्यांचा गटात दांडगा जनसंपर्क आहे. नूतन आहेर यांच्या कारकिर्दीत झालेल्या कामांचा या निवडणुकीत फायदा होऊ शकतो. गेल्या अनेक वर्षांचा राजकिय आणि समाजकार्याचा प्रदीर्घ अनुभव.
संदिप पवार – मूळचे खर्डे येथील संदीप पवार हे खर्डे विविध कार्यकारी विकास सोसायटीचे संचालक तसेच छत्रपती पतसंस्थेचे माजी चेअरमन आहेत. शेतकरी चेहरा असून, त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. नातेवाईक मित्रपरिवार यांच्या जोरावर नशीब आजमावण्याची शक्यता आहे.
बापू देवरे – मूळचे खर्डे येथील असलेले बापू देवरे हे पंचायत समितीचे माजी सभापती तसेच बाजार समितीचे माजी सभापती आहेत. सध्या ते खर्डे विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या संचालक पदावर आहेत. गटात चांगला जनसंपर्क असून राजकीय अनुभव देखील आहे.
सुनील जाधव – खर्डे ग्रामपंचायतीचे उपसरपंच असलेले सुनील जाधव हेदेखील इच्छुक उमेदवार असून, त्यांचीही तयारी सुरू आहे. ते शेतकरी असून, गटात त्यांचा चांगला जनसंपर्क असून त्यांच्या रूपाने एक नवा चेहरा या निवडणुकीत पहायला मिळणार आहे.
अंकुश सोनवणे – हे मूळचे वार्षि येथील असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचे खंदे समर्थक तसेच पत्रकार आणि मंत्री दादा भुसे यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून तालुक्यात परिचित आहेत. आक्रमक भाषण शैलीमुळे युवा वर्गात चांगला जनसंपर्क आहे. नातेगोते, संवाद कौशल्य, युवा चेहरा या बलस्थानांच्या जोरावर सोनवणे यांच्या रूपाने एक उच्च शिक्षित आणि नवा चेहरा समोर येणार आहे.
दरम्यान, हे इच्छुक उमेदवार असले तरी आरक्षण, पक्षादेश, मतदारांची इच्छा यावर या इच्छुक उमेवारांचे भवितव्य ठरणार आहे. मात्र ओबीसी किंवा जनरल आरक्षण असल्यास या गटात लढत नक्कीच तुल्यबळ ठरणार आहे. येणाऱ्या वर्षात काय राजकीय गणिते आखली जातात आणि यापैकी शेवटपर्यंत कोण टिकून राहते याकडे लक्ष असेल. तसेच तालुक्यातील तीन महत्त्वाचे नेते आ. राहुल आहेर, केदा आहेर, उदयकुमार आहेर यांची भूमिका काय असेल यावर देखील या निवडणुकीचे सूत्र अवलंबून असतील.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम