द पॉईंट नाऊ: नाशिक महापालिकेच्या आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे वेतन पाच महिन्यांपासून थकले आहे. सणासुदीच्या काळात वेळेवर वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांवर हात पसरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पुढील दहा दिवसांत वेतन न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेनेने दिला आहे. याबाबत आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना निवेदन देण्यात आले आहे.
महापालिकेची विभागीय कार्यालये, शाळा, जलशुद्धीकरण केंद्र, गोदाघाट, दवाखाने आदी ठिकाणी सुरक्षा रक्षक महामंडळाचे ४४२ सुरक्षारक्षक कार्यरत आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात घरातील खर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्याचा खर्च भागविण्यासाठी हात पसरण्याची वेळ आली आहे. मागील वेळी तब्बल वर्षभराहून अधिक कालावधीचे वेतन थकले होते. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी तत्कालीन आयुक्तांना निवेदन देत मनपासमोर आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासनाला जाग आल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यात आले. मात्र, पुन्हा में महिन्यापासूनचे वेतन थकले आहे. नियमित वेतन मिळत नसल्याचे पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. याप्रकरणी अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांना जिल्हाध्यक्ष सचिन राऊत यांनी निवेदन देऊन थकीत वेतन तत्काळ मिळावे, अशी मागणी केली.
गतवेळी वर्षभराचे थकले होते
गतवर्षी तब्बल वर्षभराहून अधिक कालावधीचे वेतन थकले होते. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांनी मनपा मुख्यालय राजीव गांधी भवनासमोर आंदोलन करून तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांना निवेदन दिले होते. त्याची प्रशासनाने दखल घेऊन वेतन अदा केले. मात्र, त्यानंतर पुन्हा पाच महिन्यांचे वेतन थकले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम