Threatening call to cricketer Yuvraj’s mother : भारतीय क्रिकेटसंघाचा स्टार क्रिकेटपटू युवराज सिंह याच्या आईला धमकी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे ४० लाख रुपयांची खंडणी देखील मागण्यात आली आहे. युवराज सिंह याची आई शबनम सिंह यांच्याकडे एका महिलेने ४० लाखांची मागणी केली. एवढेच नव्हे तर पैसे दिले नाही तर संपूर्ण परिवाराची बदनामी करेन, अशी धमकी देखील देण्यात आली होती. या प्रकरणी गुरुग्राममधील डीएलएफ फेज-१ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धमकी देणाऱ्या महिलेचे नाव हेमा उर्फ डिंपी असं आहे. या आरोपी महिलेने शबनम सिंह यांना बदनामीची धमकी देऊन ४० लाख रुपयांची मागणी केली होती. यामुळे शबनम सिंह यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांशी चर्चा करून त्यांनी एक योजना आखली. युवराजच्या आईने पैसे देण्यासाठी आरोपी महिलेकडे काही दिसांची वेळ मागून घेतली. रकमेची जमवाजमव झाल्यानंतर पोलिसांनी फिल्डिंग लावली आणि आरोपी महिलेला रंगेहाथ अटक केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राज सिंहचा भाऊ जोरावर सिंह याच्या देखभालीसाठी आरोपी महिलेला ठेवण्यात आले होते. जोरावर सिंहला नैराश्याचा त्रास असल्याने केअरटेकर म्हणून आरोपी महिलेला त्याच्या सोबत ठेवण्यात आले होते. मात्र, ती युवराजच्या भावाला तिच्या जाळ्यात अडकवू पहात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच कुटुंबाला त्रास देण्यासाठी ही महिला युवराजच्या आईला मेसेज तसेच कॉल करून धमकी देत होती. कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवून संपूर्ण कुटुंबाची बदनामी करेन, अशी धमकीही आरोपी द्यायची. तुम्हाला बदनामी टाळायची असेल तर तुम्हाला ४० लाख द्यावे लागतील, असेही तिने सांगितले. मात्र, प्रकरण पोलिसांकडे गेल्यानंतर तिला रंगेहाथ पकडण्याचं ठरवलं. दरम्यान, सुरुवातीला ५ लाख रुपये देण्याची चर्चा झाली. आरोपी महिलेने ही रक्कम मान्य केलं. आणि मग पोलिसांनी सापळा रचत महिलेला अटक केली. त्यानंतर आता महिलेला जामिन मिळाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम