नाशिक :
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ४४ प्रभागातील १३३ जागांपैकी ६७ जागा सोडत पध्दतीने महिलांसाठी आरक्षित झाल्या. यात अनुसूचित जाती प्रवर्गात १०, अनुसूचित जमाती प्रवर्गात पाच आणि सर्वसाधारण प्रवर्गातील ५२ जागांचा समावेश आहे. महिला आरक्षित जागांचे अवलोकन केल्यास २३ प्रभागांमध्ये तीन पैकी दोन जागा महिलांसाठी राखीव असून त्या प्रभागात महिलांचे वर्चस्व राहणार आहे.
एकूण जागांमधील निम्म्या म्हणजे ६७ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) अशा तीन संवर्गासाठी चिठ्ठी पध्दतीने आरक्षण काढण्यात आले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार शालेय विद्यार्थ्यांनी चिठ्ठय़ा काढल्या. अनुसूचित जातीच्या १९ जागापैकी १० जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या. यात प्रभाग १२ अ, १४ अ, २६ अ, ४१ अ, ४३ अ, ३५ अ, ३४ अ, ४४ अ, २२ अ, २७ अ यांचा समावेश आहे. अनुसूचित जमातीच्या १० जागा असून, त्यातील पाच जागा महिला आरक्षित झाल्या. यात सात ब आणि ११ ब थेट पध्दतीने तर सोडत पध्दतीने दोन अ, चार अ व ३४ या सोडत पध्दतीने महिला आरक्षित झाल्या. सर्वसाधारण प्रभागात १०४ पैकी ५२ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या. यातील ४० जागा थेट पध्दतीने तर १२ जागांसाठी सोडत पध्दतीने आरक्षण काढण्यात आले. यात १० ब, २१ ब, पाच ब, २९ ब, ३० ब, ३२ ब, ३१ ब, ३३ ब, ३६ ब, १६ ब, १८ ब आणि ३७ ब यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त थेट महिलांसाठी आरक्षित झालेल्या ४० जागा आहेत.
वेगवेगळय़ा प्रवर्गात आरक्षित झालेल्या जागांचा अभ्यास केल्यास २३ प्रभागात तीनपैकी दोन सदस्य महिलाच असतील. यात प्रभाग दोन, चार, पाच, आठ, १०, १२, १४, १६, १८, २१, २२, २६, २९, ३०, ३१, ३२, ३३, ३४, ३५, ३६, ३७, ४१ आणि ४२ या प्रभागांचा समावेश आहे. आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द झाले असून याबाबत हरकती आणि सूचना करण्यासाठी सहा जूनपर्यंत मुदत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम