नाशिक : अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषद व त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे अध्यक्ष, आणि आनंद आखाड्याचे प्रमुख स्वामी सागरानंद सरस्वती यांचे आज पहाटे देहावसान झाले आहे. ते १०१ वर्षाचे होते. १९६८ पासून त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून स्वामी सागरानंद सरस्वती महाराज हे वृद्धापकाळाने आजारी होते. त्यांच्यावर नाशिकमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून आश्रमातील साधुमहंतांनी त्यांच्या आजारपणाच्या काळात त्यांची मोठ्या प्रमाणावर सेवा केली होती. ते गेल्या सहा दशकांपासून त्र्यंबकनगरीच्या अध्यात्मिक क्षेत्रातील महान तपस्वी साधू म्हणून त्यांची ओळख होती. तसेच त्यांचा मनमिळाऊ स्वभावामुळे ते आबालवृद्धांमध्ये परिचित होते. तसेच त्यांचे राजकीय व धार्मिक क्षेत्रात मोठया स्वरुपात अनुयायी व शिष्य आहेत.
१९६८ पासून ते २०१५ पर्यंतचे त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले आहेत. ते त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेसोबतच अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदचेही अध्यक्ष होते. त्याचसोबत ते त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यासह इलाहाबाद, प्रयाग, हरिद्वार अशा १९ कुंभमेळ्यात ते सहभागी झाले होते. त्यांची ज्येष्ठ श्रेष्ठ, ज्ञानवृद्ध, तपस्वी जूने जाणते महंत अशी ख्याती आहे. २०२७ च्या आगामी कुंभमेळ्याची तयारी सुरु झाली आहे. पण येत्या कुंभमेळ्यात सहभागी होऊ की नाही हे देवाच्या हातात असते, असेही त्यांनी सांगितले होते.
शोकाकुल वातावरणात महाराजांना समाधी
स्वामी सागरानंद महाराज यांना गजलक्ष्मी मंदिर, आनंद आखाडा येथे सायंकाळी सव्वासहा वाजता रिती परंपरेनुसार समाधी देण्यात आली. तत्पूर्वी महाराजांची अंत्ययात्रा सागरानंद आश्रम, गणपत बारी पासून ते कुशावर्त चौक मार्गे तेली गल्ली, रिंगरोड मार्गे आनंद आखड्यात आणली गेली. यावेळी अंतयात्रेत त्यांचे शिष्य, अनुयायी मोठ्या प्रमाणावर सामील झाले होते.
दरम्यान, आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर येथील गणपतबारी परिसरातील सागरानंद आश्रमात जाऊन महाराजांचे अंतिम दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम