Skip to content

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच; शिवसेनेने मागितली माफी


मुंबई – शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली अशी बातमी शिवसेनेचे मुखपत्र सामनातून प्रसिद्ध करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली असल्याचे सागंण्यात आले होते. मात्र आता ‘सामना’मध्ये छापण्यात आलेली बातमी ही अनावधनाने प्रसिद्ध करण्यात आली, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध झालेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेतच आहेत, हे स्पष्ट झाले. तसेच शिवसेनेने त्यांची जाहीर माफी मागितली आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. एकनाथ शिंदेंचा फोटो शेअर करत त्यांनी त्यावर ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब !’ असं कॅप्शन लिहिलं होतं. एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्यानंतर आणि त्यांचे समर्थन केल्याच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र आता शिवसेनेने या घटनेचे स्पष्टीकरण दिले असून आढळराव पाटलांची माफी मागितली आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे मोठे नेते मानले जातात. पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात आढळराव पाटील यांचा मोठा वाटा आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघाचं पाटील यांनी १५ वर्ष प्रतिनिधीत्त्व केलं. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!