शेतकरी ते थेट ग्राहक विक्री व्यवस्था उभारणे हाच कांदा प्रश्नावरील कायमस्वरूपी तोडगा

0
10

येवला प्रतिनिधी : देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे साजरा होत असताना कृषी प्रधान देश अशी ओळख असलेल्या देशात अजूनही कांदा अपवाद वगळता नेहमीच मातीमोल भावाने विक्री करावा लागत आहे हे शेतकऱ्यांचे मोठे दुर्दैव आहे आजच्या व यापुर्वीच्या कोणत्याही सरकारचे कांद्या संदर्भातील ठोस धोरण नसल्याने शेतकऱ्यांवर ही वेळ येऊन ठेपली आहे यातून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शेतकरी ते थेट ग्राहक अशा पद्धतीने कांदा विक्री व्यवस्था उभी केल्यास शेतकऱ्यांच्या कांद्याला निश्चितच शाश्वत भाव मिळेल असे प्रतिपादन भारत दिघोळे यांनी केले ते काल सायंकाळी तालुक्यातील अनकुटे येथे बोलत होते.

यावेळी बोलतांना दिघोळे पुढे म्हणाले की सरकार कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा निर्यात बंदी करणे,परदेशी कांदा आयात करणे, बाजार समित्यांमध्ये केंद्रीय पथके पाठवणे, अधिकाऱ्यांमार्फत दबाव निर्माण करणे अशा उपाययोजना करतात परंतु कांद्याचे दर कमी झाल्यानंतर सरकार शेतकऱ्यांच्या कांद्याचा दर वाढेल यासाठी कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना करत नाही या मागील कारण म्हणजे सरकारला केवळ आणि केवळ ग्राहक हित जोपासायचे असून सर्वच राजकीय नेते निवडणुकांपुरते शेतकरी प्रश्न उपस्थित करतात परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळेल यासाठी प्रयत्न करत नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांनीही आता केवळ बाजार समितीत कांदा विक्री करण्याऐवजी थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री व्यवस्था उभी करण्याची गरज असून त्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ठोस असा कृती आराखडा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येणे गरजेचे आहे.

मार्केटिंगवर देणार भर….
आज-काल प्रत्येक गोष्टीची मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करून उद्योजक – व्यावसायिक आपापल्या मालाची स्वतः किंमत स्वतःच ठरवून विक्री करतात परंतु शेतकऱ्याला आपल्या कांद्याची किंमत ठरविण्याचा अधिकार नाही. कांद्याचा जास्तीत जास्त खप वाढविण्यासाठी राज्यात देशात व परदेशात कांदा विक्रीचे कायमस्वरूपी जाळे निर्माण करण्यासाठी आणि नियमित ग्राहक मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कांद्याचे मार्केटिंग होणेही गरजेचे असल्याचे मत श्री दिघोळे यांनी यावेळी व्यक्त केले
शेतकऱ्यांच्या मुला मुलींनी व्हावे आता कांदा उद्योजक
सर्वच सुशिक्षित मुला-मुलींना नोकरी मिळणे शक्य नसल्याने सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या पाठीमागे न लागता शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुला-मुलींनी मोठ मोठ्या शहरांमध्ये कांदा विक्री केंद्र सुरू केल्यास थेट शेतकरी ते ग्राहक विक्रीच्या माध्यमातून कायमस्वरूपी रोजगार निर्माण करुन कांदा उत्पादकांचे मुलं मुली कांदा उद्योजक होऊ शकतात असेही श्री दिघोळे यावेळी म्हणाले.

अनकुटे येथूनच करणार थेट कांदा विक्रीचा प्रयोग
कांद्याला शास्वत भाव मिळविण्यासाठी आता शेतकऱ्यांनीच शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येणारी कांदा विक्री व्यवस्था प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी तालुक्यातील अनकुटे येथील ज्या ज्या कांदा उत्पादकांनी कांदाचाळींमध्ये आपला कांदा साठवून ठेवला आहे त्यापैकी 20 टक्के कांदा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून थेट शेतकरी ते ग्राहक या पद्धतीने दिल्ली, मुंबई येथे विक्री करण्याचा प्रयोग राबविण्यात येईल असे श्री दिघोळे यांनी यावेळी सांगितले.

अखंड हरिनाम सप्ताहात शेतीवर चर्चा अनकुटे येथे एक आदर्श पायंडा शनेश्वर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात हरिपाठ, भजण, किर्तन सोहळ्यात शेतकऱ्यांनी कांदा शेती विषयावर चर्चा करण्यासाठी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांना बोलावून हा आदर्श पायंडा पाडला असून शेतकरीही आता धार्मिकते बरोबर व्यावसायिक व व्यावहारिक दृष्टीने शेतीच्या भविष्यासाठी पुढे येत आहेत हेच यावरून दिसत आहे. यावेळी अनकुटे व पंचक्रोशीतील हजारो महिला पुरुष शेतकरी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here