देवळा : एप्रिल ते जुलै २०२२ मध्ये नाफेडने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याची उर्वरित दहा टक्के रक्कम त्वरित अदा करावी अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने नाफेडचे संचालक शैलेंद्रकुमार यांच्याकडे करण्यात आली. शुक्रवार (दि.११) रोजी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
निवेदनाचा आशय असा की, नाफेडने फेडरेशन आणि इतर संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदी योजनेंतर्गत गेल्या पाच सहा महिन्यांत शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केली आहे. या व्यवहारातील दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांची बाकी आहे. शेतकऱ्यांचे राहिलेले दहा टक्के कांद्याचे पैसे अद्याप मिळालेले नसल्याने शेतकऱ्यांकडून तक्रारी होऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेच्या वतीने याबाबतचे निवेदन पिंपळगाव बसवंत कार्यालयातील नाफेडचे संचालक शैलेंद्रकुमार यांना दिले.
या पत्राची दखल घेत शेतकऱ्यांचे कांद्याचे उरलेले पैसे येत्या दहा दिवसांत अदा करण्याची कार्यवाही व्हावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी नाफेडच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करतील असा इशारा शेवटी देण्यात आला आहे. यावेळी प्रहारचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तुभाऊ बोडके, उपजिल्हाध्यक्ष कृष्णा जाधव, जगन वाकडे, समाधान बागुल, श्याम गोसावी, वैभव रोकडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम