Eknath Shinde | विधानसभा निवडणूक महायुतीने विजय मिळवला असून महायुती आता नवीन सरकार स्थापनेच्या तयारीला लागली आहे. असे असले तरीही मुख्यमंत्री पदासाठी नाव अद्याप निश्चित झाले नसून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तर भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच असल्याचे बोलले जात आहे. त्यात मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले असून सध्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी तातडीने पत्रकार परिषद बोलावली आहे.
मी स्वतःला मुख्यमंत्री कधीच समजलो नाही
यावेळी बोलताना, “विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा विजय झाला. हा जनतेचा विजय आहे. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मी स्वतःला मुख्यमंत्री कधी समजलो नाही. मी सर्वसाधारण माणूस म्हणून काम केले. आम्ही सर्वसामान्य परिवारातील प्रत्येकाला काही ना काही देण्याचा प्रयत्न केला. अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी समाधानी आहे.” असे म्हटले तसेच केंद्रातून पाठबळ दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचे आभार मानले.”
आम्ही रडणारे नाही लढणारी लोक आहोत
पुढे बोलत, “निवडणुकीतील मतांचा वर्षाव हा आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे, आम्ही केलेल्या कामांमुळे आणि दाखवलेल्या सकारात्मकतेमुळे झाला. त्यामुळेच मला लाडका भाऊ अशी नवीन ओळख मिळाली. आम्ही नाराज होऊन रडणारी लोक नाहीत लढून काम करणारी लोक आहोत. मला काय मिळाला यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं हे महत्त्वाचे आहे. मी अखेरपर्यंत जनतेसाठी काम करणार.” असं म्हणत नाराज असलेल्या चर्चांना पूर्णविराम लावला.
त्याचबरोबर, “शिवसेनेमुळे मुख्यमंत्री पदाचा निर्णय होण्यामध्ये अडचणी येत असल्याच्या चर्चांबाबत बोलताना, “आमचं घोडं कुठेही अडलेलं नाही. माझ्यामुळे अडलंय हे मनात आणू नका. महायुती म्हणून तुम्ही घेतलेला निर्णय भाजप प्रमाणे आम्हालाही मान्य आहे. मी नरेंद्र मोदींना, अमित शहांना फोन करून सांगितले आहे. कुठलाही अडथळा मनामध्ये ठेवू नका. तुम्ही घेतलेला निर्णय मला मान्य असेल.” असे सांगत आपला महायुतीला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम