Nashik Political | राज्यभरात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीचे वातावरण असून सर्वच राजकीय पक्षांनी त्यादृष्टीने आता प्रचाराला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने ‘जनसन्मान यात्रा’ काढण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने ‘शिवस्वराज्य यात्रा’ काढण्यात आली. या यात्रेचे नाशिक शहरात दोन ठिकाणी स्वागत करण्यात आले परंतु आता जागा वाटपानुसार शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघ व देवळाली विधानसभा मतदार संघ या दोन जागा महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. तेव्हा आता उमेदवारीसाठी कोणत्या उमेदवाराला ‘शिवस्वराज्य यात्रा’ फळणारं? अशा चर्चा आता होऊ लागल्या आहेत.
Nashik Political | मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सीमा हिरे यांच्या कामांचे कौतुक
इच्छुक उमेदवार प्रचाराच्या तयारीला
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार व कामगार नेते जगदीश गोडसे तसेच अतुल मते, गोकुळ पिंगळे त्याचप्रमाणे गणेश गीते हे पूर्व विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. या सर्व उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू केला असून जगदीश गोडसे यांनी तर जेलरोड येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्नेह मेळाव्याचे आयोजन करून एक प्रकारे निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंगच फुंकले आहे. त्याचप्रमाणे, इतर उमेदवारांनी देखील आपला प्रचार सुरू केला आहे. त्यात आठवड्यातच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे. तेव्हा आता या इच्छु उमेदवारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबद्दल चर्चा सुरू असून उमेदवारी मिळवण्याबाबत कोण बाजी मारतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तसेच जागा वाटपामध्ये देवळाली मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळणार हे आता जवळजवळ निश्चित झाले असून परिणामी देवळाली मतदारसंघातून अनेक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. देवळाली मतदारसंघांमध्ये शिवस्वराज्य यात्रा आली तेव्हा सगळ्याच इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह मेळाव्याला हजेरी लावून एक प्रकारे शक्तिप्रदर्शनही केले होते.
मोजक्या उमेदवारांबरोबर दाराआड चर्चा
यादरम्यान, या मेळाव्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मार्गदर्शन केले. परंतु, कार्यकर्ते ज्यांच्या भाषणाची वाट बघत होते, ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाषण केलेच नाही. त्यामुळे उपस्थितांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. त्यात पाटील यांनी उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची ओळख करून दिली व त्यानंतर काही उमेदवारांना एका खोलीमध्ये बोलवून त्यांच्याशी चर्चा देखील केली. या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याने आता उमेदवारी नेमकी कोणाच्या गळ्यात पडते, याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे एक प्रकारे ‘शिवस्वराज्य यात्रा’ दोन्ही मतदार संघात कोणत्या उमेदवाराला पावणार? अशा चर्चा सध्या सुरू आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम