Nashik Political | नाशकात आज व्हीआयपींची वर्दळ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे लोकार्पण

0
52
#image_title

Nashik Political | महाराष्ट्रमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही केली जाऊ शकते. याच पार्श्वभूमीवर आज शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज नाशिकमध्ये येणार आहेत. मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून मुंबई नाका येथे साकारण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा देशातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राॅंझ धातूच्या पुतळ्याचे त्यांच्या हस्ते लोकार्पण पार पडणार आहे. तसेच भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या पुढाकाराने उभारण्यात येत असलेल्या मराठा विद्यार्थी वसतिगृह, धनगर विद्यार्थी वसतिगृह अशा विविध कामांचे भूमिपूजन देखील आज पार पडणार आहे. तेव्हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून महायुतीकडून आगामी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली जाणार आहे.

आज या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडणार

महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे लोकार्पण आज पार पडणार असून त्याचबरोबर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे भूमिपूजन, सारथी संस्थेचे विभागीय कार्यालयाचे भूमिपूजन, धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे भूमिपूजन, वन भवन इमारतीचे भूमिपूजन, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानातील नूतनीकरण कामाचे लोकार्पण, महिला रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन, इंदिरानगर बोगदा रुंदीकरण कामाचे भूमिपूजन, बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे लोकार्पण इत्यादी भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमांचे आयोजन आज करण्यात आले आहे.

Nashik Political | अमित ठाकरे नाशिक मधून विधानसभेच्या रिंगणात उतरणार?

हि निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई

तर आगामी विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार असून त्यासाठी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक घोषित होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यामुळे लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर येती विधानसभा निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी साठी अस्तित्वाची लढाई बनली आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुतीकडून राबविण्यात येत असलेल्या लोकोपयोगी योजना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमार्फत लोकांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत.

Nashik Political | नाशकात विधानसभेची धुमाळी; पश्चिम मतदार संघात महायुतीत चुरस

नाशकात आज व्हीआयपींची मांदियाळी

तसेच, मागील पाच वर्षांपासून केलेल्या विकास कामांची त्याचप्रमाणे मंजूर कामांच्या भूमिपूजनाची लगबग सुरू झाली असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी नाशिकमध्ये विविध कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार गोपीचंद पडळकर, खासदार राजाभाऊ वाजे, भास्कर भगरेंसह इतर आमदारांची उपस्थिती राहणार आहे. एकंदरीत शनिवारी नाशिक शहरात व्हीआयपींची एक प्रकारे मांदियाळी पाहायला मिळणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here