Nashik Political | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासमोर अपक्ष बाबू भगरे नावाने डमी उमेदवार उभा केल्याचा प्रकार फार चर्चेचा विषय बनला होता. आता विधानसभा निवडणुकीत देखील राजकारण्यांकडून असा डाव टाकला जात असून नाशिक पूर्व मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार गणेश गितेंविरुद्ध नाव सार्धम्य असलेल्या उमेदवाराने अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तर विरोधकांना पराभव समोर दिसत असल्यामुळे आपले नाव साधर्म्य असलेल्या व्यक्ती शोधून बळजबरीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास भाग पाडले. असल्याचा गंभीर आरोप गणेश गीते यांनी केला आहे.
मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
गणेश गीते यांनी काल शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यानंतर पत्रकार परिषद घेत पूर्व मतदारसंघातून अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराच्या राजकीय खेळीवर त्यांनी टीका केली. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार राहुल ढिकले भाजपच्या वतीने महायुतीची उमेदवारी करत असून मागील पाच वर्षात मतदारसंघात खरोखर विकास झाला असता, तर गावोगावी फिरून गणेश गीते नावाचा माणुस शोधून त्याला उमेदवारी दिली गेली नसती. तसेच अशाप्रकारे मतदारांची दिशाभूल करण्याची गरज भासली नसती. जिंकण्याची खात्री नसल्यामुळे आपल्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे.” असे म्हणत विरोधकांकडून गणेश गीते नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला जात असल्याचा पुरावा देत गणेश गीते यांनी संबंधितांमध्ये झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील पत्रकारांसमोर यावेळी सादर केली.
राहुल ढिकलेंनी फेटाळले आरोप
दरम्यान, भाजपचे उमेदवार एडवोकेट राहुल ढिकले यांनी गणेश गीते यांचे आरोप फेटाळले असून लोकशाहीत प्रत्येक उमेदवाराला उमेदवारी करण्याचा अधिकार असून निवडणुकीत लक्ष वेधण्याकरिता केलेला हा विरोधकांचा स्टंट आहे. मुळात मीच मागणी करतो की, या फेक ऑडियोची फॉरेन्सिक तपासणी करावी व सत्यता पडताळावी. तसेच पोलिसांनी देखील चौकशी करून कारवाई करावी.” अशी मागणी यावेळी ढिकलेंकडून करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम