Nashik | अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांना ‘धर्मभूषण’ पुरस्कार प्रदान

0
35
#image_title

Nashik | ११ व्या शतकात महानुभाव संप्रदायातील गुरू श्री. गोविंद प्रभू यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी व समाजाच्या कल्याणासाठी व्यतीत केले. स्त्री आणि शूद्र यांनाही समाजातील अन्य घटकांप्रमाणेच भक्ती व उपासना करून आपला उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून समाजाला पटवून दिले. त्यांनी तत्कालीन समाजातील अन्यायमूलक रूढींवर प्रहार करून ते सर्व समाजघटकांत समभाव व सौहार्द निर्माण केले. अस्पृश्यतेला गोविंद प्रभुनी वाचा फोडली. गोविंदप्रभु हे महाराष्ट्रातील परिवर्तनाचे आधारस्तंभ असून भगवान गोविंद प्रभू, श्री. चक्रधर स्वामी सामाजिक समतेचे आद्यप्रवर्तक असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी येवला तालुका महानुभाव समिती यांच्यावतीने भगवान श्री. गोविंद प्रभू जयंती उत्सवाचे माऊली लॉन्स, विंचूर रोड, येवला येथे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.

Nashik | नाशिकच्या वैशाली शिंपी यांनी अमेरिकेच्या घरात बसवला पर्यावरणपूरक गणपती

“श्री. चक्रधर स्वामीच लळाचित्र चरित्र ग्रंथाचे केंद्रबिंदू”

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जसे कृता-त्रेतायुगात श्री. दत्तात्रेय आणि द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले. तसे कलियुगात श्री. चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील परमेश्वर अवतार आहेत आणि महानुभाव पंथाचे संस्थापक आहेत. ते महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानानुसार ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार आहेत. गोविंद प्रभु हे त्यांचे गुरु होते. श्री. चक्रधर स्वामी यांनी आपल्या गुरु कडून मिळालेल तत्वज्ञान समाजात रुजविण्यासाठी पुढे काम केल. लीळाचरित्र या मराठीतील पहिला चरित्रग्रंथाचे केंद्रबिंदू श्री. चक्रधर स्वामीच असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. चक्रधर स्वामिंनी देशभरात विविध ठिकाणी पायपीट केली. गावोगावी, वाडोवाडी जाऊन लोकांना जागृत केले. त्यांना अंधश्रद्धा आणि श्रद्धा यातील फरक समजावून सांगितला. अंधश्रद्धेच्या गर्तेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी अनेक संत व महापुरुषांनी प्रयत्न केले. महाराष्ट्रात तर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी झटणारी एक मोठी परंपरा आपणास पाहावयास मिळते. संत ज्ञानेश्वर, तुकाराम ते गाडगेबाबा, तुकडोजी महाराज ही संतपरंपरा आणि आगरकर, महात्मा फुले ते दाभोलकर, श्याम मानव अशी समाजसुधारकांची परंपरा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर झटत आली. या सर्वांनी आपल्या कृती आणि उक्तीतून समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आज अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी स्वामींचा हा कृतिशील विचार दिशादर्शक ठरणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

Nashik | सुरगण्यात पावसाची संततधार; नदी-नाल्यांना पूर तर घरांचीही पडझड

ते म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पर्यटन मंत्री असताना जाळीचा देव, डोमेग्राम आणि महानुभाव पंथाच्या इतर अनेक देवस्थानांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. दि. ५ सप्टेंबर हा दिवस भगवान सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन म्हणून साजरा करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे. त्यांच्या जीवनकार्याशी संबंधित तसेच महानुभाव पंथाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या एकूण ५ देवस्थानांच्या विकास आराखड्यांना दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी प्रदान करण्यात आली.

त्यानुसार श्री. क्षेत्र रिद्धपूर, ता. मोर्शी, जि. अमरावती २५ कोटी, श्री क्षेत्र पांचाळेश्वर ता. गेवराई, जिल्हा बीड ७ .९० कोटी, श्री. क्षेत्र पोहीचा देव, कोळवाडी, ता. जि. बीड ४.५४ कोटी, श्री. जाळीचा देव, ता. भोकरधन, जिल्हा जालना २३.९९ कोटी, श्री. गोविंद प्रभू देवस्थान, भिष्णूर, ता. आष्टी, जिल्हा वर्धा १८ कोटी असा एकूण ७८ कोटी रुपयांचे आराखडे मंजूर करण्यात आले आहेत. तसेच येवला तालुक्यातील सायगाव येथील चक्रधर स्वामी मंदिरास ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त होईल. असे त्यांनी सांगितले.

मंत्री छगन भुजबळ यांना ‘धर्मभूषण’ पुरस्कार प्रदान

महानुभाव पंथांच्या विविध मंदिरांसाठी भरीव निधी तसेच महानुभाव पंथाच्या विविध कार्यक्रमांसाठी वेळोवेळी विशेष योगदान दिल्याबद्दल अखिल भारतीय महानुभाव परिषद प्रणित नाशिक जिल्हा व येवला तालुका महानुभाव परिषदेच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांना महंत सुकेणकर बाबा, महंत चिरडेबाबा, महंत यशराज बाबा शास्त्री यांच्या हस्ते ‘धर्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येऊन गौरविण्यात आले. या पुरस्कारात मंत्री छगन भुजबळ यांना भगवान विष्णूची मूर्ती देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी माजी आमदार मारोतीराव पवार, माजी आमदार नरेंद्र दराडे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, महंत सुकेणकर बाबा, महंत चिरडेबाबा, महंत यशराज बाबा शास्त्री, लासलगाव बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप, जयदत्त होळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, मच्छिंद्र थोरात, गुणवंत होळकर महिला अध्यक्षा राजश्री पहिलवान, तानाजी आंधळे, ज्ञानेश्वर आंधळे यांच्यासह पदाधिकारी व महानुभाव पंथातील अनुयायी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here