नाशिक – दोन वर्षे कोविड संकटानंतर यंदा सर्व सण-उत्सव निर्बंधाविना पार पडत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी गणेशोत्सव जल्लोषात पार पडल्यानंतर आता सर्वाना नवरात्रीचे वेध लागले आहे.
अवघ्या काही दिवसांत नवरात्रोत्सव येत असल्याने ठिकठिकाणी देवीच्या मूर्ती कामांना वेग आला आहे. तर, गरबा-दांडिया प्रशिक्षण शिबिरांनाही गर्दी होऊ लागली आहे. कोविडमुळे गेली दोन वर्ष गरबाप्रेमींना उत्सवाचा आनंद घेता आला नाही. तो यंदा घेता येणार असल्यामुळे तरुणाईंमध्ये याचा आनंद दिसून येत आहे.
त्यामुळे आता सर्वांच्या नजरा नवरात्रोत्सवावर लागल्या आहे, शहरातील अनेक भागात मंडप उभारणी सुरू झाली असून काही ठिकाणी दांडिया आणि गरबाचे प्रशिक्षण शिबिरेदेखील सुरू झाले आहे. तर दुसरीकडे कारागिरांकडूनही मूर्तीकामांना वेग येत आहे. शेरावाली, सप्तशृंगी, दुर्गा, रेणुकामाता अशा विविध देवीच्या मुर्ती कारागिरांकडून तयार केल्या जात आहे.
त्याचप्रमाणे घट बसविण्यासाठी लागणाऱ्या टोपल्या, माठ, गरबा यासह दांडिया तयार करण्याचे कामेदेखील सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवप्रमाणे यंदा नवरात्रोत्सवही मोठ्या जोमात साजरा होणार आहे.
तरुणाईमध्ये आनंद व उत्साह
नवरात्रोत्सव म्हटले, की गरबा-दांडिया खेळण्याकडे सर्वांचा कल असतो. विशेष करून, तरुणाईंमध्ये गरबा खेळण्याचा जोश ओसंडून वाहतो. त्यासाठी तरुण-तरुणी पारंपारिक पोशाख खरेदी करतात. तसेच काहीजण तर, दांडिया आणि गरबा खेळण्याचे प्रशिक्षण घेत असतात. तसेच अनेक मोठ्या मंडळीकडून गरबा-दांडिया खेळाचे आयोजन केले जाते. यासाठी अनेक मैदाने, लॉन्स गच्च भरलेली असतात. पण गेल्या दोन वर्षी कोविडमुळे तरुणांना हा आनंद घेत नव्हता आला, तो यंदा घेता येणार असल्यामुळे तरुणांमध्ये जोश भरलेला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम