Nashik News | दिंडोरी तालुक्यात यंदा खरीप हंगाम जोरदार झालेला असला तरी टोमॅटो आणि भाजीपाल्याला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आता द्राक्ष हंगाम, कांदा, भाजीपाला आणि रब्बी पिकांवर शेतकऱ्यांची मदार असलेली दिसणार आहे. यंदा धरणांमध्ये पाणीसाठा चांगला असला तरी जिल्ह्यात इतर ठिकाणी दुष्काळी स्थिती असल्याने पाणी पळवापळवीची चिंता लागली आहे.
Nashik News| नाशिकहून जायकवडीला पाणी सोडणार; पाणी संघर्ष पेटणार..?
टोमॅटो तसेच भाजीपाल्याला भाव नसल्याने तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढत असून द्राक्ष छाटणी हंगाम अंतिम टप्प्यात येऊन रब्बी पिकांची तयारी सुरू आहे. विजेचे वाढते भारनियमन आणि कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने शेतकरी त्रस्त आहेत. गेल्या वर्षी तालुक्यात तब्बल 1657 मिमी पाऊस झाला होता. सर्व धरणे ओव्हरफ्लो झालेली होती. वर्षभर अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचीही नासाडी झाली होती. गारपिटीने द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झालेले होते. शासनाने नुकसान भरपाई दिली परंतु ती कमी पडली. टोमॅटो-भाजीपाल्यालाही अपेक्षित भाव मिळालेला नाही. यंदा तरी चांगले दिवस येतील या आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो, भाजीपाल्याची लागवड केली. हंगामापूर्वी टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते. परंतु हंगाम सुरू होताच दर दोन ते तीन रुपयांवर आले. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघालेला नाही.
कादवा सहकारी साखर कारखान्यातर्फे चेअरमन श्रीराम शेटे यांनी गावोगाव ऊस लागवडीसाठी बैठका घेतल्याने शेतकरी उसाकडे वळलेले आहे. यंदाच्या हंगामासाठी सुमारे 3200 हेक्टर ऊस लागवड झाली असून पुढील हंगामासाठी आडसाली आणि पूर्व हंगामी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रब्बी हंगामासाठी टोमॅटो तसेच भाजीपाला काढून त्या जागेवर गहू, हरभरा पेरणीची शेतकऱ्यांची तयारी सुरू आहे. भारनियमनामुळे शेतकऱ्यांना पाणी असून पिकांना पाणी देता येत नसल्याने ते कोंडीत सापडलेले आहेत. वीज पुरवठा अखंड करण्याची मागणीही आता होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम