First solar flour mill in Nashik district पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तिकरण पुरस्कार प्राप्त झालेल्या नाशिकच्या दरी ग्रामपंचायत नुकतीच सौर उर्जेवर चालणाऱ्या पिठाची गिरणी सुरू केली आहे.
जिल्ह्यातील पहिलीच सौर ऊर्जेवरील पिठाची गिरणी पुरस्काराच्या आठ लाख रुपयांच्या रकमेमधून सुरू करण्यात आली आहे. तर ग्रामपंचायतीने सुरू केलेली ही गिरणी आर्थिक दुर्बल घटकांमधील कुटुंबाला आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी चालवायला दिली जाणार आहे. तर यामुळे गावातील लोकांना देखील अगदी कमी दरामध्ये आपलं धान्य दळून मिळणार आहे.
पेसा अंतर्गत असलेलं दरेगाव दोन हजारांच्या आसपास या गावची लोकसंख्या आहे. मात्र हे गाव एक आदर्श गाव म्हणून समोर येतय. या गावाला निर्मल ग्राम पुरस्कार, पर्यावरण विकास रत्न, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानांतर्गत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, कुपोषण मुक्त गाव म्हणून हे गाव जाहीर झाले आहे. तर अस्पृश्यता निवारणार्थ प्रथम क्रमांकाचं प्रशस्तीपत्रक देखील या गावाला मिळाल आहे.
मागील वर्षी केंद्रस्तरावरचा अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा सशक्तिकरण पुरस्कार दरी गावाला प्राप्त झाला आहे. या पुरस्कारा अंतर्गत आठ लाख रुपयांची रक्कम ग्रामपंचायतिला मिळाली होती. याच रकमेमधून दरी ग्रामपंचायतने सौर उर्जेवर चालणारी पिठाची गिरणी सुरू केली आहे. याचबरोबर गाव व प्राथमिक आरोग्य केंद्र माध्यमिक शाळा यांना जोडणारा अत्यंत गरजेचा लोखंडी पूल ही दोन महत्त्वाची काम या बक्षिसाच्या रकमेमधून करण्यात आली आहे.
गावामध्ये सातत्याने अखंडित होणारा वीज पुरवठा यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यातच 24 तास चालणारी गिरणी गावात उपलब्ध व्हावी या हेतूने ग्रामपंचायतीने ही गिरणी उभारली आहे. यासाठी जवळपास आठ लाख 50 हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे ही गिरणी ग्रामपंचायतीने उभारली असली तरी मात्र एका गरजू कुटुंबाला ती चालवण्यासाठी देण्यात आली आहे.
ग्रामपंचायतच्या या निर्णयामुळे गरजू कुटुंबातील लोकांना आर्थिक आधार मिळणार आहे. तसेच संबंधित कुटुंबाचे मजुरीसाठी वारंवार होणार स्थलांतर देखील थांबेल. तर 24 तास चालणाऱ्या गिरणी मधून जवळपास 60 टक्के उत्पन्न ग्रामपंचायतीला मिळणार आहे. अत्यंत कमी अर्थातच अडीच ते तीन रुपये किलो प्रमाणे या ठिकाणी दळण्याचे दर ठेवण्यात आले आहे. यामुळे गावातील लोकांना देखील याचा फायदा होणार आहे.
नुकताच या गिरणीचा लोकार्पण सोहळा पार पडला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांच्या हस्ते या गिरणीचा लोकार्पण करण्यात आलं. तसेच यावेळी दरी ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन देखील करण्यात आलं.
दरी ग्रामपंचायतने यापूर्वी अनेक उपक्रमांमधून अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. सौर उर्जेवर चालणारी पहिली गिरणी सुरु करून दरी ग्रामपंचायतिने सर्वांसमोर एक आदर्श उभा केलाय. भविष्यामध्ये दरी या ठिकाणी ऑक्सिजन पॉकेट तयार व्हावे यासाठी आपण काम करणार आहोत.
आशिमा मित्तल – कार्यकारी अधिकारी – जिल्हा परिषद, नाशिक
24 तास सौर उर्जेवर चालणारी गिरणी दरी ग्रामपंचायतीने सुरू केली असून यामुळे सर्व नागरिकांना अल्प दरामध्ये दळण मिळणार आहे. तर गरजू कुटुंबाला रोजगार देखील यामुळे उपलब्ध झाला आहे. गावात जास्तीत जास्त रोजगार निर्मिती व्हावी यासाठी ग्रामपंचायतीकडून भर देण्यात येणार असल्याचं ग्रामसेवक सचिन पवार यांच्याकडून यावेळी सांगण्यात आलं.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम