संपूर्ण शेतीच विषमुक्त; पिंपळगाव निपाणीच्या शेतकर्‍याची कमाल

0
10

महेश पगारे, अकोले
तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील प्रयोगशील शेतकरी संजय वाकचौरे हे संपूर्ण शेती विषमुक्त करत आहे. सद्यपरिस्थितीत शेतीची अवस्था बघता त्यांची संपूर्ण शेतीच विषमुक्त असल्याने शेतकर्‍यांसाठी नवा आदर्श ठरत आहे. या शेतीसाठी स्वतः औषधी वनस्पतींपासून औषधे तयार करत असल्याने अनेक शेतकर्‍यांसाठी हा कुतूहलाचा विषय ठरत आहे.

प्रयोगशील शेतकरी संजय वाकचौरे यांनी डोंगरगाव शिवारात ही विषमुक्त शेती फुलवलेली आहे. सध्या मेटाकुटीला आलेला शेतकरी, शेतमालाला मिळणारा कवडीमोल बाजारभाव, कृषी निविष्ठा व त्यांचा दर्जा, रासायनिक पद्धतीने केली जाणारी शेती व त्यातून निर्माण होणार्‍या माती आणि मानवाच्या आरोग्य समस्या या सर्व समस्यांवर अनेक अभ्यास व प्रबंध तयार झाले. मात्र त्यातून फारसे काही निष्पन्न होईल असे चित्र सध्या तरी दिसत नाहीये. यावर मार्ग काढण्यासाठी शेतकरी संजय वाकचौरे यांनी आपल्या शेताच्या बांधावरच प्रयोगशाळा उभारली आहे. यामळे त्यांनी बाजारातून महागड्या कृषी निविष्ठा खरेदी करणे संपूर्णपणे थांबवले आहे. बाजारातून आणलेल्या महागड्या कृषी निविष्ठा व त्या तुलनेत मिळणारा शेतमालाला बाजारभाव याचे गणित बिघडल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

त्यासाठी घरच्या घरी तयार केलेले उत्कृष्ट दर्जाचे गांडूळ खत, गांडूळ पाणी, उच्च प्रतीचे जीवामृत, बीजामृत, बुरशीनाशके, कीटकनाशके व विविध प्रकारच्या स्लरी यांच्या माध्यमातून ते संपूर्ण शेती विषमुक्त पिकवत आहे. धोतरा, गुळवेल, सीताफळ या औषधी वनस्पतींपासून उत्तम दर्जाचे बुरशीनाशक ते तयार करतात. विश्वास बसणार नाही इतक्या कमी खर्चात हे सर्व निर्माण करत आहे. रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करूनही जे बुरशीजन्य रोग नियंत्रणात आणता येत नाहीत त्यावर त्यांनी तयार केलेले औषध रामबाण उपाय ठरत आहे. डाळिंबावरील येणार्‍या असाध्य तेल्या रोगावर सुद्धा त्यांनी मात करून डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. संपूर्णपणे सेंद्रीय पद्धतीची डाळिंब बाग परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. आणि हे केवळ शेतावर उभारलेल्या प्रयोगशाळेमुळे शक्य झाले असल्याचे ते आवर्जुन सांगतात. सध्या त्यांच्या शेतामध्ये अ‍ॅपल बोर, सफरचंद, नारळ, लिंबू यांसारखी फळपिके डौलात उभी आहेत.

अत्यंत मेहनती असलेल्या वाकचौरे कुटुंबाला आजपर्यंत अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे, पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे, राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, आमदार डॉक्टर किरण लहामटे, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप यांच्यासह अनेक प्रगतिशील शेतकरी व अभ्यासक यांनी भेट देऊन बांधावरची प्रयोगशाळा समजून घेतली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here