Deola | देवळा तालुक्यात वीज पडल्यामुळे दोघांचा मृत्यू तर, कांदा शेड्स व घरांचेही नुकसान

0
65
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  देवळा तालुक्यातील उमराणे व परिसरात रविवारी (दि. ९) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे तिसगाव येथील एका वीस वर्षीय तरुणावर वीज पडून त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर, उमराणे येथे कांदा शेड कोसळून एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच वीज पडून एक बैलदेखील ठार झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी (दि. ९) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उमराणे व परिसरातील तिसगाव येथे विजेच्या कडकडीत तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात तिसगाव येथील शरद बाबुराव देवरे यांच्या शेतात वीज पडून बैल ठार झाला व त्यांचा मुलगा आकाश शरद देवरे (वय २०) रा. तिसगाव याच्यावर देखील वीज कोसळली यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. तसेच याठिकाणी वादळात एका घराचे व कांदा शेड वरचे पत्रे उडून आर्थिक नुकसानही झाले आहे.

तर उमराणे येथील कांदा शेड कोसळून देवीदास भाऊराव आहेर (वय ४०) रा. तिसगाव या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर गायत्री सूरज देवरे (वय २२) व अभय अजय देवरे (वय साडे तीन वर्षे) हे जखमी आहेत. या वादळात उमराणे येथे बहुतांश कांदा शेड्स व घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, या घटनेचे तातडीने पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.

दरम्यान ,उमराणे व तिसगाव परिसरात रविवारी दुपारी झालेल्या वादळामुळे जीवित हानी आणि अनेक घरांचे पत्रे उडाल्याने आर्थिक नुकसान झाले असून, मुंबई आग्रा महामार्गावर अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. यात वीजपुरवठा खंडित झाला असून, प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. यात घटनेत तिसगाव येथील दोन व्यक्तींचा आकस्मित मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here