सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | सहाय्यक अभियंता या पदासाठी नुकत्याच पार पडलेल्या परीक्षेत खर्डे (ता. देवळा) येथील किशोर भामरे यांची निवड झाली आहे. या परीक्षा IBPS (Institute of Banking and personal Selection, Mumbai) या संस्थेमार्फत घेण्यात आल्या. जिद्द व चिकाटीच्या जोरावर भामरे याने यश संपादन केले आहे. किशोरचा लहानपण ते आतापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी व संघर्षमय असून देवळा तालुक्यातील अतिदुर्गम अशा खर्डे गावातील तो एक शेतकरी पुत्र आहे. लहानपणापासून शेती कामात वडिलांना मदत करून अभ्यासातील अव्वलपणा कधीही त्याने सोडला नाही. प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण त्याचे खर्डे येथे झाले आहे. कुटुंबातील आर्थिक अडचणीवर मात करून शिक्षणामधील गोडवा कमी होऊ दिला नाही.
इयत्ता दहावी मध्ये 89.64% गुण मिळवून पुढील शिक्षण सामणगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन येथून विद्युत अभियांत्रिकीत डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. डिप्लोमामध्ये सुद्धा त्याला 92.81% गुण मिळाले होते. डिप्लोमा उत्तीर्ण झाल्यावर, घरातील आर्थिक अडचणीमुळे वडिलांनी नोकरी करण्यासाठी आग्रह धरला होता. परंतु डिप्लोमामध्ये मिळालेल्या गुणाच्या जोरावर किशोरला महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची संधी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे प्राप्त झाली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. यावेळी राज्यात 2010 ते 2013 मध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे वडील दादाजी भामरे आपल्या कुटुंबाचे पालन पोषण व चार मुलांचा शैक्षणिक खर्च पुरा पाडू शकत नव्हते.
Deola | खर्डे येथे भरदिवसा बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
अशा परिस्थिती मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तत्कालीन संचालक डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मधून किशोर यांना एक लाख ऐंशी हजार रुपये शैक्षणिक कर्ज मिळवून दिले. यातून किशोरला महाविद्यालयीन खर्च पूर्ण करण्यास हातभार लागला. जिद्द व चिकाटीच्या जोरावर अभियांत्रिकी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. या काळातच त्याने GATE परीक्षेत चांगले गुण मिळवले व आयआयटी मद्रास येथे एमटेक व पीएचडी शिक्षणासाठी संधी मिळाली. मात्र आर्थिक अडचणी व कौटुंबिक जबाबदारी लक्षात घेता त्याने पुढील शिक्षण थांबविण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयीन शिक्षणाच्या शेवटच्या वर्षी खाजगी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध असताना देखील त्याने खाजगी क्षेत्रातील नोकरीस नापासंती दर्शवली.
घरची आर्थिक परिस्थिती व चार मुलांची शैक्षणिक व लग्नाची जबाबदारी असताना देखील त्यांच्या वडिलांनी महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर एक वर्ष दिल्लीला जाऊन स्पर्धा परीक्षाची तयारी करण्यास किशोरला हिंमत दाखवली. एक वर्षाच्या अर्धवट स्पर्धा परीक्षाच्या तयारीला रामराम ठोकत त्याने 2017 साली नोकरी करून वडिलांना हातभार लावून स्वतःची व काही कौटुंबिक जबाबदारीत वडिलांना मदत करण्याचा निर्णय घेतला. उत्तम शैक्षणिक पार्श्वभुमी व मुलाखतीच्या आधारावर 2017 मध्ये त्याला कोकण रेल्वेमध्ये उपअभियंता म्हूणन रेल्वे विद्युतीकरणाच्या कामात संधी मिळाली.
त्यानंतर 2021 मध्ये कोकण रेल्वेत उत्तम कामगिरी आणि मुलाखतद्वारे त्याला विभाग अभियंता म्हणुन महामुंबई मेट्रोमध्ये काम करण्यास संधी मिळाली. त्याला रेल्वे कर्षण प्रणालीचा सहा वर्षाचा अनुभव असल्याने आता महापारेषण मध्ये अतिउच्च विद्युत दाब विद्युत वाहक प्रणालीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. या प्रवासात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करून किशोरने यशाला गवसणी घातली असून, त्याच्या ह्या यशाबद्दल खर्डे व परिसरात कौतुक करण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम