सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | गिरणा नदीपात्रातील जुन्या ब्रिटिश कालीन बंधाऱ्याची दुरावस्था झाली असून, याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी या भागातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी स्थानिक आमदार खासदारांकडे केली होती. याची दखल घेत दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरेंच्या सुचनेनुसार गुरुवारी दि. २३ रोजी या ठिकाणी अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. देवळा चांदवड तालुक्यात कायम चर्चेत राहिलेल्या वसंत दादा सहकारी साखर कारखाना बंदच आहे. तर कधी काळी चोवीस तास वाहत असलेली गिरणा नदी फेब्रुवारीतच कोरडी पडते. स्वातंत्र्य पुर्व व त्यानंतरच्या दशकात गिरणा नदीवर अनेक ठिकाणी उसाचे फड बागायती शेती होती.
त्यासाठी नदी पात्राला जोडून कळवण. देवळा तालुक्यात नदीच्या पात्रात चुन्यात दगडी बांधकाम करण्यात आले. नाकोडा, बेज, भादवण, विठेवाडी, सावकी, लोहोणेर, ठेंगोडा शिवारात गिरणा नदीवर बंधारे बांधून पाटचारीने फड बागायतीची निर्मिती करुन शेकडो एकर उसाची शेती केली जात होती. त्यासाठी सिंचन विभागाची स्वतंत्र व कार्यक्षम यंत्रणा कार्यरत होती. सन ऐंशीच्या दशकानंतर हळूहळू गिरणेच्या पाण्याला ओव्हटी लागली आणि फड बागायत हळूहळू मोडीत काढून त्या जागी कांदा, मका, ऊस अशी संमिश्र पिके घेतली जाऊ लागली आहेत. फड बागायतीच्या उद्देशाने बांधलेले बंधारे पाणी साठवून ठेवण्यासाठी साठवण बंधारे म्हणून दिर्घकाळ पर्यंत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी कामी येऊ लागली.
Deola | देवळा येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
मधल्या काळात ९० च्या दशकात येथील शेतकऱ्यांनी गिरणा मोसम नदीच्या पात्रातील जुन्या ब्रिटिश कालीन बंधाऱ्याची डागडुजी व दुरुस्ती व्हावी म्हणून तत्कालीन आदिवासी विकासमंत्री कै. ए. टी पवार तसेच तत्कालीन विधानसभा सभापती ना. स. फरांदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि गिरणा, मोसम या नद्यांवरील जुन्या ब्रिटिश कालीन बंधाऱ्याची दुरूस्तीसाठी भरीव अशी आर्थिक तरतूद करुन युद्धपातळीवर काम करण्यात आले. त्यात काही बंधाऱ्याची उंचीही वाढविण्यात आली. मुख्यतः विठेवाडी, सावकी, खामखेडा, भऊर असे लाभक्षेत्र असलेल्या जुन्या बंधाऱ्याची उंची वाढविण्यात आली. २० वर्षापूर्वी भगदाड बुजून मजबूतीकरण करण्यात आले होते.
परंतु सततच्या पावसाने व पाण्याच्या दाबामुळे ते तुटून निकामी झाले आहेत. त्यांची दुरुस्ती व्हावी म्हणून अनेक वेळा स्थानिक लोकप्रतिनिधींनी व प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दुरुस्तीची मागणी केली गेली. तसेच अनेक वेळा वसंत दादा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून देखील शासन आणि प्रशासनाकडे याची मागणी करून देखील काहीही झाले नाही. अशी खंत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भगरे यांनी खामखेडा, विठेवाडी भागात दौऱ्यात आले असता त्यांची स्थानिक शेतकऱ्यांनी भेट घेऊन या धरणाच्या दुरुस्तीची मागणी केली होती.
Dada Bhuse | शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची देवळा तालुक्यातील शाळांना अचानक भेट
गेल्या चार महिन्यांपासून नदीला पाणी असल्याने सर्व्हे (पाहणी) करता येत नव्हती. मात्र सध्या पाणी कमी झाल्याने, आज खासदार भगरे यांच्या सुचनेनुसार पाटबंधारे विभाग कळवणचे शाखा अभियंता डि. बी. गावित, स्थापत्य अभियंता एस. एम भोये, एन. बी गुजर, हिरामण गायकवाड यांनी दुरुस्ती संदर्भात पाहणी केली व मोजमाप घेतले. यावेळी खासदार भगरे यांनी दुरध्वनीवरुन उपस्थित शेतकऱ्यांशी संपर्क साधला व लवकरच लवकर अंदाज पत्रक सादर करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी शेतकरी कुबेर जाधव, वसंत बोरसे, धनंजय बोरसे, फुला आप्पा जाधव, मोहन शेवाळे आदी शेतकरी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम