सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यातील वडाळा येथील पाझर तलावात शेकडो मृत कोंबड्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पश्चिम भागातील अतिदुर्गम अशा वडाळा गावात असलेल्या पाझर तलावाच्या पाण्यात गुरुवारी (दि.५) रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी पोल्ट्री फार्ममधील पाचशे हुन अधिक मृत कोंबड्या फेकून दिल्या आहेत. या पाझर तलावात गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर असून, या घटनेमुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दरम्यान, या परिसरात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. गेल्या महिन्यात खर्डे परिसरात असलेल्या निवाने बारी घाटात मृत कोंबड्या गोण्यामध्ये भरून फेकून दिल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी केली होती. बहुतांश पोल्ट्री फार्म धारक मृत कोंबड्या खड्ड्यात न पुरता निर्जनस्थळी फेकून देत असल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे कृत्य करणाऱ्यांवर सबंधित अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम