देवळा : श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध कीर्तनकार संजय महाराज धोंडगे यांना महाराष्ट्र शासनाचा कीर्तन व समाजप्रबोधन क्षेत्रातील ‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४’ जाहीर झाला असून, येत्या चार सप्टेंबरला त्यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेत संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तन, प्रवचन व व्याख्यानांच्या माध्यमातून तरुणांमध्ये सत्कर्माचा आग्रह, आचार-विचारातील शुद्धता, व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न व इतर सामाजिक कार्यात श्री. धोंडगे यांचे योगदान मोठे आहे.
Deola | दि देवळा मर्चंटस् को. ऑप. बँकेच्या नाशिक शाखेचे स्थलांतर व उद्घाटन सोहळा
भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या दिंडोरी लोकसभा प्रमुखपद व त्यानंतर प्रदेश सहसंयोजक म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज देवस्थानच्या जीर्णोद्धारात त्यांचे योगदान राहिले असून मोठमोठे किर्तनमहोत्सव ते आयोजित करत असतात. गायन, वादन व वक्तृत्व कलेला प्रोत्साहन देत त्यांनी अनेकांना कीर्तन क्षेत्रात उभारी दिली.
‘किर्तन केसरी’ म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून महाराष्ट्र शासनाचा हा राज्य सांस्कृतिक पुरस्कार त्यांना जाहीर झाल्याने वारकरी संप्रदायाचा हा गौरव आहे. येत्या ४ सप्टेंबर रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून, त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आमदार डॉ.राहुल आहेर, नाफेडचे संचालक व भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर, भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे तुषार भोसले यांच्यासह कीर्तनकारांनी श्री.धोंडगे यांचे अभिनंदन केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम