Deola | रात्री पीकाला पाणी भरायला गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

0
3
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | कणकापूर येथील युवा शेतकरी दीपक संजय बच्छाव (वय २३) याचा विहिरीत तोल जाऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने कणकापूरसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, कणकापूर येथील प्रगतीशील शेतकरी संजय झापर बच्छाव यांनी दिवसा वीजपुरवठा राहत नसल्याने आपला मुलगा दिपक बच्छाव (२३) याला सोमवारी (दि. ३) रोजी रात्री १० वाजता आपल्या घराच्या शेतात कांद्याना बारे (पाणी) देण्यासाठी पाठवले होते.

Deola | देवळा येथील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने सोयाबीन खरेदीचा शुभारंभ

तो रात्री घरी आलाच नाही म्हणून आई वडील त्याला शेतात शोधण्यासाठी गेले असता मुलगा दीपक विहिरीच्या पाण्यात तरंगताना दिसून आला. ही घटना समजताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली व मृत दिपकला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. यानंतर पोलीस पाटील दौलत जैन यांनी या घटनेची पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेची देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत दीपक बच्छाव याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने कणकापूर, कांचने, खर्डे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांदा लागवड झाली असून, वीजपुरवठा सुरळीत नसल्याने व विजेचे टाईम टेबल चुकीचे असल्याने शेतकऱ्यांना रात्री अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी कसरत करावी लागते. त्यात तालुक्यात बिबट्यांचा मुक्त संचार देखील वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा वीजपुरवठा असता तर कणकापूर येथील घडलेली दुर्दैवी घटना घडली नसती. वीज वितरण कंपनीने तालुक्यात दिवसा सुरळीत वीजपुरवठा सुरू करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

– जगदीश शिंदे (उपसरपंच, कणकापूर ता. देवळा)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here