सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | गेल्या काही दिवसांपूर्वीच देवळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात 8 शेळ्या आणि 1 वासरू ठार झाल्याची घटना समोर आली होती. यानंतर आता मेशी (ता.देवळा) येथे हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मेशीसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. मेशी येथे कमळाबाई सुपडू शिरसाठ (वय ६१) या महिलेचा हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
Deola | नेमकं काय घडलं..?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मेशी शिवारात सुपडू गणपत शिरसाठ हे आपल्या पत्नीसह शेतात राहत होते. मात्र शनिवारी दुपारी तीन वाजता सुपडू शिरसाठ हे आपल्या मुलीकडे दहिवड येथे गेले व रात्री ते तेथेच मुक्कामी राहिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ते मेशी येथे आपल्या घरी आले असता. त्यांनी बाहेरून पत्नीला आवाज दिला. मात्र घरातून प्रतिसाद न आल्याने ते घरात गेले असता पत्नी कमळाबाई ह्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. ते भयभीत झाले व आरडाओरडा करत त्यांनी शेजाऱ्यांना बोलावले. मात्र नेमकं काय झालं आणि कशामुळे झालं..? हे त्यांना समजत नव्हते.
Deola | देवळा तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण; बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या ठार
शेजाऱ्यांनी बघितले तर, कमळाबाईच्या मानेवर, छातीवर नखं लागल्याचे लक्षात आल्यावर काही तरी हिंस्र प्राण्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचे समजले. तर काही नागरिकांच्या मते हा बिबट्याचाच हल्ला असल्याचे सांगण्यात आले. कारण या परिसरात बिबट्याचा याआधीही वावर असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर लगेचच मेशी येथील वनरक्षक भुपेंद्र राठोड यांना कळविले असता, राठोड यांसह वनक्षेत्र अधिकारी कौतिक ढुमसे, वनपाल प्रसाद पाटील, वनरक्षक विजय पगार, ज्योती सोनवणे घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी देखील सर्व प्रकार समजून घेत कुठल्यातरी हिंस्र प्राण्याचा हल्ला असल्याचे सांगितले. काही शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार हा बिबट्याचाच हल्ला असल्याचे बोलले जात आहे. मात्र वनविभागाच्या टीमने आजूबाजूला बिबट्याच्या पायाचे ठसे शोधण्याचा प्रयत्न केला असता तेथील जागा मुरमाड असल्याने कुठेही बिबट्याच्या पायाचे ठसे आढळलेले नाहीत. त्यानंतर देवळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पाटील, पोलीस हवालदार चौधरी, गवळी हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी देखील घटनेचा पंचनामा केला.
Deola | बिबट्याच्या हल्ल्यात मुलूखवाडी येथील ‘वाघ’ जखमी
त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आणि सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान परिसरात बिबट्याचा वावर असून वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. यावेळी वनविभागाने खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ त्याठिकाणी पिंजरा व ट्रॅप कॅमेरा लावला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम