सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सहसंयोजकपदी त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष तथा देवळा येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प संजय नाना धोंडगे यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची नुकतीच घोषणा केली असून त्यात तुषार भोसले हे संयोजक असून त्याखालोखाल ह.भ.प संजयनाना धोंडगे यांची महाराष्ट्र सह संयोजकपदी नियुक्ती करण्यात आल्याने देवळा तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याआधी भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या दिंडोरी लोकसभेच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या योगदानाची दखल घेत प्रदेश सहसंयोजक म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे निकटचे स्नेहबंध असून अध्यात्मिक कार्यात त्यांचा दबदबा आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात संजयनाना धोंडगे यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. देव, देश आणि धर्मासाठी आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आध्यात्मिक क्षेत्रातून मोठी ताकद आपण उभी करू असे धोंडगे यांनी यावेळी सांगितले. या निवडीबद्दल माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, आमदार डॉ.राहुल आहेर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर, बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, आदींनी अभिनंदन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम