जळगाव : रावेर तालुक्यातील अहिरवाडी परिसरात आज (दि.३१) झालेल्या वादळामुळे केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर एका २८ वर्षीय युवकाच्या डोक्यावर झाडाची फांदी पडल्याने जखमी झाला आहे. तसेच काही घरांवरील पत्रे देखील उडल्याचे वृत्त आहे. तसेच काही प्रमाणात पाऊस देखील झाला आहे. यामुळे ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रावेर तालुक्यातील अहिरवाडी, कुंभारखेडा, पाडला, केऱ्हाळा, मुंजलवाडी आणि मोहगन या गावांमध्ये आज सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अहीरवाडी गावात काही घरांवरील पत्रे उडले असून प्रशांत कौतिक सावळे हा त्यांच्या गुरांच्या गोठ्यामध्ये जात असताना त्यांच्या डोक्यावर बाभळाच्या झाडाची फांदी पडल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तर गोपाळ धनगर या शेतकऱ्याचा केळीचा बाग पूर्ण झोपला आहे. तसेच यावल तालुक्यातील हिंगोणा येथे वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सुरुवात झाली. यात ग्रामपंचायत परिसरातील झाड तसेच गावात काही ठिकाणी झाडे कोसळली. यात काही घरांचे नुकसान झाले असून, वादळी वाऱ्याने अनेक लोकांच्या घरावरील पत्रे सुद्धा उडाली. या वाऱ्यामुळे वीज पुरवठा देखील काही तास खंडित झाला होता. यात शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे सुद्धा नुकसान झाल्याचे वर्तविण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम