Congress Political | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आले असून काँग्रेस पक्षात उमेदवारीवरून गोंधळ सुरू असतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. इगतपुरी मतदारसंघात ज्या नावाची कोणीच शिफारसच केली नाही अशा उमेदवाराला पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
इगतपुरी मतदारसंघाकरिता प्रबळ उमेदवार नव्हता
काँग्रेसचे इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील आमदार हिरामण खोसकर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. यानंतर पक्षाला प्रबळ उमेदवार कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता. या मतदारसंघात एकूण 15 उमेदवार इच्छुक होते. त्यामुळे पक्षाकडे निवड करण्यास वाव होता. परंतु त्यात निवडून येण्याची क्षमता या निकषात हे उमेदवार बसत नव्हते. त्यामुळे माजी आमदार व शिवसेनेचे उपनेते निर्मला गावित यांचा पक्षाने विचार करावा अशी मागणी करण्यात आली.
या संदर्भात पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत विचारविनिमय करून निर्णय घ्यावा, अशी सूचना केली होती. त्याप्रमाणे, त्रंबकेश्वर-इगतपुरी तालुका पदाधिकारी व स्थानिक कार्यकारणी सदस्यांनी बैठक घेतली. ज्यामध्ये एकमताने माजी आमदार निर्मला गावित यांना उमेदवारी द्यावी, असा ठराव करण्यात आला. यानंतर पक्षाचे सर्व पदाधिकारी इगतपुरी येथे एसएमबीटी महाविद्यालयात विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांना भेटले. मतदारसंघात पक्षाची परिस्थिती बिकट असून माजी आमदार निर्मला गावित या सर्व दृष्टीने सक्षम उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवारी द्यावी असा निर्णय एकमताने कळविण्यात आला.
अपरिचित व्यक्तीला इगतपुरी मतदारसंघातून उमेदवारी
परंतु जेव्हा उमेदवारांची यादी जाहीर झाली, तेव्हा अकोला तालुक्यातील व थोरात यांच्या संपर्कात असलेल्या लकी जाधव या व्यक्तीला उमेदवारी जाहीर करण्यात आली. संबंधित व्यक्ती इगतपुरी तालुक्यातील नसून ते फारसे परिचित देखील नसून जाधव यांच्या बाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी देखील आहेत. असे असताना देखील अशा व्यक्तीला उमेदवारी मिळालीच कशी? याचा धक्का पक्षाच्या कार्यकर्त्यांना बसला असून दोन दिवसांपूर्वी त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. अनेक कार्यकर्त्यांनी थेट पक्षाचे नेते राहुल गांधी व महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनीतला यांच्याकडे याबाबत तक्रारी दाखल केल्या आहेत.
लकी जाधव यांच्या उमेदवारी विरोध
अनेकांनी थेट नेत्यांशी संपर्क करून लकी जाधव यांना उमेदवारी दिल्यास पक्षाचा दारुण पराभव होईल. असे निदर्शनास आणून दिले. यानंतर पक्षाची यंत्रणा जागृत झाली असून रविवारी पक्षाने इगतपुरी मतदारसंघासाठी दोन निरीक्षक पाठवले होते. त्याआधी पक्षाच्या 65 पदाधिकाऱ्यांनी लकी जाधव यांच्या उमेदवारीच्या निषेधार्थ काँग्रेस प्रदेश चिटणीस भास्कर गुंजाळ यांच्याकडे राजीनामे दिले होते. त्यानंतर रविवारी पक्ष निरीक्षकांशी यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.
Congress Political | मविआतील जागांचा पेच सुटेना; एकमत न झाल्यास मैत्रिपूर्ण लढत होणार?
येत्या 24 तासात पक्षाने उमेदवार बदलून माजी आमदार निर्मला गावित यांना उमेदवारी द्यावी. असे न झाल्यास पक्षाचे सर्व पदाधिकारी राजीनामे देतील व इगतपुरी मतदारसंघात सांगली पॅटर्न राबवला जाईल असं म्हणत सर्व पदाधिकारी व पक्षाचे इच्छुक उमेदवार निर्मला गावित यांना अपक्ष उमेदवारी करण्यास आग्रह करणार आहेत. या सर्व घडामोडींमुळे काँग्रेसचे निरीक्षक आणि इगतपुरीचा उमेदवार गंभीर शंका निर्माण होते. तसेच लकी जाधव या अनोळखी व्यक्तीस उमेदवारी मिळणे ही गोष्ट जाणीवपूर्वक घडली की अनावधानाने अशा चर्चा आता होऊ लागल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम