Mumbai : महाराष्ट्रात होणार असलेले उद्योग हे गुजरात तसेच भाजपशासित राज्यामध्ये नेले असल्याचा आरोप नेहमीच होत असतो यातच या आरोपांना पूर्णविराम देण्यासाठी बुधवारी पार पडलेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये चाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या अनेक मोठ्या प्रकल्पांना शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, अहमदनगर, रायगड, मुंबई यांसह विविध भागांमध्ये हे प्रकल्प साकारण्यात येणार असून यामुळे सुमारे एक ते दीड लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे.
पुणे आणि औरंगाबाद या ठिकाणी देशांमध्ये प्रथमच होणार असलेल्या सुमारे 12 हजार 482 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक व्हेईकल आणि बॅटरी निर्मिती प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे.
तर मुंबईच्या महापे या ठिकाणी जेम्स अँड ज्वेलरी पार्क या प्रकल्पाला अतिविशाल प्रकल्पाचा दर्जा देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर दिली आहे.
पुणे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गोरे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर्फे इलेक्ट्रिक व्हेईकल आणि बॅटरी निर्मिती तसेच पार्किंग स्टेशन बांधणी करण्यात येणार आहे. हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. यामुळे या प्रकल्पाला महाकाय प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली असून संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 12000 बॅटरी स्वॅपिंग स्टेशन स्थापन करणार असल्याचे देखील सांगण्यात आलं आहे. तरी यामुळे राज्यांमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल धारकांना पायाभूत सुविधा आणि ईव्हीच्या वापराला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील इतर एनर्जी कंपनीद्वारे 865 कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असून ही कंपनी भारतातील इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांपैकी एक आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात पुरवठादार इकोसिस्टीम स्थापन होण्यास मदत होईल असं देखील यावेळी सांगण्यात आलं. पुणे येथील ईबस निर्मितीच्या 786 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या घटकाच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असून पुणे येथे पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन या घटकाकडून भारतामधील तांत्रिकदृष्ट्या सर्वात प्रगत व्यावसायिक इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन इंधन सेल वाहन निर्मिती सुविधा उभारण्यात येणार आहेत.
यामुळे पुढील दशकात देशातील उत्पादन उद्योगात सर्वात मोठे योगदान या कंपनीचं राहणार असून त्यामुळे येत्या काळात पुणे या ठिकाणी इलेक्ट्रिक वेहिकल आणि हायड्रोजन हब बनण्यास मदत होणार आहे. नवी मुंबई येथील महापे येथे उभारण्यात येणाऱ्या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क प्रकल्पाला 21 एकर जागा मंजूर करण्यात आली आहे तर 1354 औद्योगिक आणि व्यापारी आस्थापना या ठिकाणी स्थापन होतील.
महाराष्ट्रामध्ये रत्न आणि दागिने क्षेत्रातील घटकांसाठी सुविधा विकसित करण्यासाठी तसेच गुंतवणूक उत्पादन रोजगार व्यापार आणि निर्यात यांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन यामुळे मिळेल तर वीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक या प्रकल्पात होण्याची शक्यता आहे यामुळे या प्रकल्पादरम्यान लाखोंच्या संख्येने रोजगार निर्मिती होणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम