महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांनी अंगिकारणे आवश्यक – छगन भुजबळ

0
11

नाशिक: शिक्षण आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणाचे हे साधन जीवनात वापरुन आपण काहीही चांगले साध्य करू शकतो. शिक्षणाचे महत्व विशद करतांना क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी “ विद्येविना गती गेली, गती विना मती गेली, मती विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले असा तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिक्षण हे वाघिणीच दूध आहे आणि जो हे दूध पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे शिक्षणाचे महत्व विशद करणारे प्रेरणादायी मंत्र आपल्याला मिळत आहेत. या महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगिकारणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

माळी सेवा समितीच्या वतीने नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ.कैलास कमोद, समितीचे अध्यक्ष विजय राऊत, उत्तमराव तांबे, चंद्रकांत बागुल, बाळासाहेब जानमाळी, राकाशेठ माळी, हरिश्चंद्र विधाते, बाजीराव तिडके, दौलतराव गांगुर्डे, प्रभाकर क्षीरसागर, प्रा.टी.पी.निकम, किशोर भास्कर, पी.एम.सैनी, डॉ.सुभाष पवार, योगेश कमोद, सचिन माळी, प्रदीप गायकवाड, विलास जगताप, डॉ.सुभाष पवार, राजकुमार सुर्यवंशी, महेंद्र शेवाळे, प्रमोद आहेर, औद्योगिक सुरक्षा विभागाचे अप्पर संचालक देविदास गोरे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, वंचित बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यामुळे आज बहुजन समाजातील विद्यार्थी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करत आहे. विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांचे शेतकऱ्यांचा आसूड आणि गुलामगिरी पुस्तक वाचावे तसेच प्रत्येकाच्या घरात ही पुस्तके असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात रुजविण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण आजही देशातील काही शक्ती या महापुरुषांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे आपण सर्व वारसदार असून त्यांचं काम पुढे नेण्यासाठी समाजाने एकसंघ राहून काम करावं. त्यांनी दिलेल्या शिकवणी नुसार एकसंघ राहून समाजातील इतर छोट्या छोट्या वंचित घटकांना सोबत घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात ठेवण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी करत ज्या महापुरुषांनी आपल्याला शिक्षण दिले त्या सर्व महापुरुषांचे आपण पूजन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, माळी समाज सेवा समितीच्या वतीने दरवर्षी के.जी पासून पी.जी पर्यंतच्या माळी समाजातील नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा उपक्रम अविरत सुरु आहे. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळणे अतिशय महत्वाची असून समितीचा हा उपक्रम ही अतिशय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगत आपण सर्व विद्यार्थी उज्ज्वल भारताचे भविष्य आहात. आधुनिक काळात विद्यार्थ्यांना करियर करण्यासाठी अनेक क्षेत्र आहे. विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीच्या क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवीत यशाचे शिखर गाठावे. त्यातून स्वतः सोबत समाजाचे आणि देशाचे हित जोपासावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी डॉ.कैलास कमोद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मोहन माळी यांनी केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here