नाशिक : राज्यात पावसाच्या धुवांधार बरसण्याने जिल्ह्यात जून ते ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी आज शासन निर्णयानुसार वितरीत केला आहे.
जिल्ह्यात जून, जुलै मध्ये झालेल्या नुकसानीसाठी रू. २५ लाख ४९ हजार तर ऑगस्ट – सप्प्टेंबर २०२२ च्या नुकसानीसाठी २३ लाख रुपये व जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी एकूण रू. ४८ लाख ४९ हजार निधी आज वितरित केला आहे.
जिल्ह्यातील सिन्नर येथे झालेल्या अतिवृष्टीनंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून शेतकऱ्यांना आधार देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार तात्काळ पंचनाम्यासह मदतीसाठी शासनस्तरावर यासाठी पाठपुरावा केला होता त्यानुसार मदत जाहीर झाली आहे.
शेती पिकांचे देखील या अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. जून व जुलै, २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार निधी वितरीत करण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
मृत जनावरांसाठी मदत, पुर्णत: नष्ट,अंशत: पडझड झालेली कच्ची, पक्की घरे, झोपडी, गोठे यासारख्या नुकसानीसाठी मदत व इतर अनुज्ञेय असलेला बाबींच्या नुकसानीकरिता बाधितांना राज्य वाढीव दराने मदतीचे वाटप करने तर या शासन निर्णयान्वये ७ कोटी २४ लाख ६६ हजार तसेच ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२२ या कालावधीत मालमत्तेच्या नुकसानीकरिता २० कोटी ६९ लाख १८ हजार असा एकूण रुपये २७ कोटी ९३ लाख ८४ हजार इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत राज्यातील विविध अतिवृष्टी ग्रस्त संबंधित जिल्ह्यांना वितरीत करण्यास शासनाने मंजूरी देण्यात आली आहे.
त्यात नाशिक जिल्ह्याला जून, जुलै २०२२ मधील झालेल्या नुकसानीसाठी रू. २५ लाख ४९ हजार, ऑगस्ट सप्प्टेंबर २०२२ मधील नुकसानीसाठी रू. २३ लाख असा जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी एकूण रू. ४८ लाख ४९ हजार निधी वितरित करण्यात आला आहे.
ज्या घरांची पडझड झाली आहे किंवा ज्या पात्र घरांमध्ये दुकानांमध्ये सामानाची नासधूस झाली आहे यांचा समावेश आहे. यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याचसाठी सदर निधी खर्च करण्याचे व वेळोवेळी या संदर्भात निर्गमित शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तीचे पालन करण्यात यावे, असे निर्देश या शासन निर्णयानुसार देण्यात आले आहेत.
सद्यस्थितीत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या होत असलेल्या नुकसानींचेही तातडीने पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव शासनास सादर करण्याची प्रक्रिया प्रशासनामार्फत सुरू आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम