द पॉईंट नाऊ न्यूज ब्युरो: राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चिंतेची बाब समोर येत आहे. औरंगाबाद मध्ये कांद्याच्या भावात फक्त पंधरा दिवसात तब्बल दीड हजार रुपयांची घसरण नमूद करण्यात आली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
सध्या मिळत असलेल्या बाजारभावात कांदा पिकासाठी आलेला उत्पादन खर्च काढणे देखील मुश्किल असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. जिल्ह्यातील लासुर एपीएमसीमध्ये बुधवारी चांगल्या दर्जाच्या कांद्याला देखील एक हजाराच्या आतच भाव मिळाला.
लासूर एपीएमसी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी कांदा विक्रीसाठी येत असतात.
मागच्या महिन्यात म्हणजेच 25 फेब्रुवारीला या एपीएमसीमध्ये कांद्याला 2475 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला तर आता बुधवारी 16 मार्च रोजी याच एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात कांद्याला फक्त 955 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला.
म्हणजेच वीस दिवसात कांद्याच्या भावात तब्बल 1500 रुपयांची घसरण बघायला मिळाली. एपीएमसीमध्ये लाल कांद्याची आवक होत आहे, याबरोबरच आता हळूहळू उन्हाळी कांद्याची आवक देखील वाढू लागली आहे. यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली असल्याचे स्पष्ट होत आहे
शेतकऱ्यांच्या मतानुसार सध्या खाद्यतेलापासून ते इंधनापर्यंत सर्वांचेच दर वाढत आहेत. या वाढत्या महागाईत कांद्याला मिळत असलेला हा कवडीमोल दर परवडणारा नाही. सध्या मिळत असलेल्या दरात कांद्यासाठी आलेला उत्पादन खर्च निघणे देखिल कठीण झाले.
कांदा लागवडीसाठी लागणारी मजुरी, बियाणे, औषधे, कांदा काढण्यासाठी लागणारी मजुरी याचा एकत्रित विचार केला तर सध्या मिळत असलेला दरातून हा उत्पादन खर्च निघू शकत नाही. एकंदरीत सध्या मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून शेतकर्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम