नाशिक : दोन दिवसांपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाने जोर धरल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यात मालेगावमधील गिरणा नदीपात्रात मासेमारीसाठी गेलेले 15 तरुण हे पाणी पातळी अचानक वाढल्याने एका खडकावर अडकले. अखेर १५ तासांनंतर त्यांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले. दरम्यान, संपूर्ण रात्र खडकावर बसून काढल्यानंतर आज सकाळी या तरुणांनी सुटकेचा श्वास सोडला आणि मध्यमानशी बोलताना तरुणांनी घटनेचा थरार कथन केला. (Girna River Rescue)
रविवारी गिरणा नदी (Girna River) पात्रात सवंदगाव शिवारात मालेगाव, धुळे येथील १५ तरुण मासेमारी करण्यासाठी गेले होते. मात्र, पाणी पातळी वाढल्याने ते अडकून पडले. काळपासूनच स्थानिक अग्निशमन पथकाकडून त्यांच्या बचावासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यांना यश आले नाही आणि त्यात अंधारामुळे रेस्क्यु ऑपरेशन थांबवण्यात आले. दरम्यान, आज सकाळी लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या (Helicopter) मदतीने या तरुणांना रेस्क्यू करण्यात आले. हेलिकॉप्टरने तीन फेऱ्या करत या नदीपात्रात अडकलेल्या 15 मासेमारांना बाहेर काढले.
Deola | गिरणा नदी पात्रातून अधिकाऱ्यांच्या मेहरबानीने वाळू तस्करी; ग्रामस्थांचे गंभीर आरोप
Girna River Rescue | तरुणांनी सांगितला घटनेचा थरार..
दरम्यान, सुटकेनंतर तरुणांनी सांगितले की, “आम्ही महिन्यातून केवळ एक ते दोन वेळेस या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी येतो. आम्ही या भागात रोज येत नाही. काल आम्ही या ठिकाणी मासेमारी करायला गेल्यानंतर दहा मिनिटात पाणी वाढायला सुरुवात झाल्याने आम्ही तिथे त्या खडकावरच अडकून पडलो. रात्री पाऊस नव्हता. मात्र अचानक नदीचे पाणी वाढले. त्यामुळे आम्ही रात्रभर तिथे खडकावर बसून होतो. नदीचे पाणी वाढत होते. त्यामुळे थोडी भीती वाटत होती”.
तर, याबाबत पोलिसांनी सांगितले की, “नदीची पाणी पातळी जास्त असल्याने रेस्क्यू करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. कालही प्रयत्न केले. मात्र, नंतर अंधारामुळे रेस्क्यू ऑपरेशन थांबवले होते. त्यानंतर आज सकाळपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करून सर्व तरुणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे”. रेस्क्यू ऑपरेशननंतर या सुटका करण्यात आलेल्या तरुणांची प्रशासनातर्फे वैद्यकीय चाचणी करण्यात आली. (Girna River Rescue)
Deola | गिरणा नदीवरील के.टी वेअरमुळे पाणी प्रश्न मार्गी लागणार – आ. राहुल आहेर
अग्निशमन दल, एसडीआरएफ पथकांना अपयश
कळवण, दिंडोरी या तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने येथील चणकापुर व हरणबारी ही धरणं ओव्हरफ्लो झालीत. या धरणांतून गिरणा नदीत पाणी सोडले गेले. अचानक पाणी वाढल्याने हे सर्व 15 मासेमार नदीपात्रात अडकले होते. येथील स्थानिक अग्निशमन दलाने त्यांना रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे एसडीआरएफच्या पथकाला बोलावण्यात आले. त्यांच्याकडूनही काल रात्रीपासून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांचेही सर्व प्रयत्न अयशस्वी ठरत होते.
दरम्यान, आज सकाळी वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार, अखेर आज 12 वाजेच्या सुमारास वायुसेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने तीन फेऱ्यांमध्ये या 15 मासेमारांना सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. यावेळी मंत्री दादा भुसे, आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, प्रांताधिकारी नितीन सदगिर आदींकडून रेस्क्यू ऑपरेशननंतर समाधान व्यक्त करण्यात आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम