द पॉईंट नाऊ प्रतिनिधी: काही दिवसांपूर्वी तीन ते चार हजार रुपये असलेला कांद्याचा भाव आता 1900 रुपयांवर आला आहे. त्यामुळे कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याची वेळ आली आहे. देशांतर्गत कांद्याचे भाव नियंत्रित करण्यासाठी सरकारने काही मोठी पावले उचलली आहेत.
इराण, तुर्कस्तान आणि अफगाणिस्तानमधून नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेल्या बंपर स्टॉकसह कांदा आयात केला जात आहे. आशिया खंडातील कांद्याची आघाडीची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विविध बाजार समित्यांमध्ये सात दिवसांत कांद्याच्या दरात एक हजार रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे कांद्याला आता साधारण 1 हजार 900 रुपये भाव मिळत आहे. सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. बारामतीसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयाचा फटका बसला असून दर स्थिर राहण्याची गरज यानिमित्ताने शेतकरी व्यक्त करीत आहेत.
गेल्या आठवड्यात बाजारात कांद्याचा सरासरी भाव 2,880 रुपये होता. मात्र, नाफेडचा बंपर साठा आणि मोठ्या प्रमाणात परदेशी कांद्याचा देशात प्रवेश यामुळे कांद्याच्या दरात दररोज घसरण होत आहे. आतापर्यंत टप्प्याटप्प्याने बाजारभावात एक हजार रुपयांची घसरण झाली आहे.बुधवारी बाजारभाव 1,900 रुपयांपर्यंत खाली आला आहे. सध्या बारामतीच्या जिरायती भागात कांद्याची लागवड केली जात असली तरी काही ठिकाणी कांदा परिपक्व झाला आहे. लाल कांद्याची कमाल बाजारभाव 2,551 रुपये आणि किमान 999 रुपये आणि सरासरी किंमत 2,201 रुपये प्रति क्विंटल आहे.
कांद्याचे बाजारभाव असेच घसरत राहिल्यास कांदा उत्पादकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी बाजार समित्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.गेली दोन-तीन दिवसांपासून दौंड तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. नानगाव परिसरात अवकाळी पावसाचा शिडकावाही झाला. त्यातच पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
दौड तालुक्यातील बागायती व जिरायती भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला व फळभाज्या पिकांची लागवड करतात. बागायती भागात ऊस हे मुख्य पीक असले तरी बऱ्याच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित तरकारी पिकांवर अवलंबून असते; तर जिरायती भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित तरकारी व फुलांच्या पिकांवर अवलंबून असते. अशात अवकाळी पाऊस झाल्यास तरकारी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम