Mahur : तीर्थक्षेत्र माहूर गडावर गावठी बॉम्बचा स्फोट झाल्याने एक भाविक गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याने मंदिर परिसरात भीतीच वातावरण पसरल आहे.
नांदेड जिल्ह्यात असलेल्या तीर्थक्षेत्र माहूरगडावरील श्री दत्त शिखर संस्थान ते अनुसया माता संस्थाना दरम्यान जाणाऱ्या मार्गाने नामदेव उमाजी वानोळे वय 78 राहणार सावरगाव तालुका हादगाव हे दर्शनासाठी अनुसया माता मंदिराकडे जात होते. यावेळी त्यांना जात असताना मंदिराच्या पायऱ्यांवर बेवारस अवस्थेमध्ये विचित्र गोळ्या सारखी वस्तू निदर्शनास आली, यावेळी त्यांनी ती हातात घेऊन पाहताच त्याचा हातात स्फोट झाला. यामध्ये त्यांच्या डाव्या हाताचा अंगठा आणि बोट निकामी झाले आहेत. 30 जूनला सकाळच्या सुमारास ही घटना घडली असून यामुळे माहूरगड परिसरामध्ये एकाच खळबळ उडाली आहे.
माहूर शहरामध्ये काही दिवसांपूर्वी गोरक्षकांवर काही समाजकंटकांकडून हल्ला करण्यात आला होता. यामुळे माहूरगड व शहर परिसरामध्ये पोलिसांकडून मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. माहूरगडावर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश यांसह महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. अशा वर्दळीच्या ठिकाणी मंदिराच्या पायऱ्यांवर गावठी बॉम्ब आढळल्याने माहूर शहरामध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आल आहे. या स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने परिसरातच असलेल्या श्री चिंतामण भारती महाराजांसह भाविकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि जखमी वानोळे यांना माहूर ग्रामीण रुग्णालयाच्या ॲम्बुलन्स मधून ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रथमोपचारासाठी दाखल केलं त्या ठिकाणी त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सदानंद शिंगारे, पोलीस निरीक्षक नितीन काशीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, संजय पवार यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली.
माहूर येथील गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्यानंतर शहरामध्ये तणावाचं वातावरण असतानाच तीर्थक्षेत्र माहूरगडावरील श्री दत्त शिखर संस्थान येथे गावठी बॉम्बचा स्फोट झाल्याने परिसरात पर्यटनासाठी आलेल्या भाविकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल आहे. तर उलट सुलट चर्चांना देखील उधान आलं असून आता या प्रकरणी पोलीस तपासात काय माहिती समोर येणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागलं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम