Harit vari : मागील शेकडो वर्षांपासून महाराष्ट्राला पंढरीच्या पायी वारीची परंपरा लाभली आहे. आषाढी एकादशीसाठी संत ज्ञानेश्वरमहाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह इतर संताच्या पालख्या लाखो वरकाऱ्यांसह पंढरीला जात असतात. बदलत्या युगात ही पायी वारी देखील कात टाकत नवीन रूप धारण करत आहे. या वारीच्या सोहळ्यात विविध उपक्रम दरवर्षी राबवले जातात. यात पुणे जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘हरित वारी’ अभियानाअंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत यंदा 10 हजार वृक्षांची लागवड आणि संवर्धन करण्यात येणार आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीचा ‘हरित वारी’ उपक्रम राबवण्यात येत आहे. उपक्रमांतर्गत पालखी तळ आणि पालखी मार्गावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. वारकऱ्यांना वृक्षाचे महत्व समजावून देण्यासोबतच त्यांच्या हस्ते ठिकठिकाणी वृक्ष लागवड ही करण्यात येत आहे. चिंच, वड, चाफा, पाम, नारळ, गुलमोहोर, कडुलिंब, पिंपळ, रेन ट्री, करंज, मोहोगनी, जांभूळ अशा विविध प्रकारच्या आरोग्याकारी व उपयुक्त वृक्षांची लागवड या उपक्रमाद्वारे करण्यात येत आहे. त्यासाठी रोपे देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. आतापर्यंत नगरपालिकेतर्फे 3 हजार 225, ग्रामपंचायत तर्फे 2 हजार 350 आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे 2 हजार असे एकूण 7 हजार 575 वृक्ष लावण्यात येत आहेत. या वृक्षांचे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत संवधर्नही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यावतीने देण्यात आली आहे.
सात नगरपालिका आणि 25 ग्रामपंचायत क्षेत्रातही वृक्ष लागवड करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणातर्फे ‘हरित वारी’ अंतर्गत लोणंद ते दिवेघाट दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील पिसुर्टी, निरा, पिपरे, बाळुपाटलाची वाडी, पाडेगाव, लोणंद इत्यादी परिसरातील चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा जवळपास 2 हजार झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील सात नगरपालिका आणि 25 ग्रामपंचायत क्षेत्रातही शेकडो वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील संपूर्ण वारी मार्गावर हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या असून पुणेकर नागरिकांनी देखील या उपक्रमात आवर्जून सहभागी व्हावे, अस आवाहन उपजिल्हाधिकारी वनश्री लाभशेटवार यांनी केले आहे. तर दुसरीकडे पुणे जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमाचा आदर्श घेत इतर महापालिकांनी देखील असे उपक्रम राबवण्याची गरज आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम